जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथील ग्रामसभेत विविध नागरी समस्यांवरून ग्रामस्थांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला.
घरकुलांचे प्रलंबित प्रस्ताव, गावातील तोडलेल्या स्वच्छतागृहांमुळे होणारी असुविधा, शौचालयांसह विविध मूलभूत प्रश्नांवर शनिवारी झालेल्या आसोदा येथील ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नबाबाई बिर्हाडे होत्या. तथापि, अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील शासकीय अधिकार्यांनी ग्रामसभेला दांडी मारली. प्रारंभी सुरुवातीस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयातील अपूर्ण जागेत सभा न घेता, खुल्या प्रशस्त जागेवर सभा घेण्याचा आग्रह महिला, ग्रामस्थांनी मांडला. अखेर बाजारपेठेतील जागेत सभा घेण्यात आली. ग्रामसेवक एम. टी. बागडे यांनी विविध शासकीय योजनांचे वाचन केले. या वेळी एकच गोंधळ झाल्याने गदारोळ वाढला. यामुळे सभा आटोपती घेण्यात आली.