धुळे । गेल्या 10 वर्षांपासून महापालिका बरखास्त करा, अशी उबळ आमदारांना येत असते. महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी खर्या अर्थाने या आमदारांचा डोक्याला ताप दिला आहे. त्या तापात ‘बरखास्त करा, अपात्र करा, तुरुंगात टाका’ अशी वायफळ बडबड ते करीत असतात. एकदा तर 10 ऑक्टोबर ही बरखास्तीची तारीख जाहीर करुन टाकली, आगाऊ फटाके फोडून टाकले! या शेखचिल्लीचे करावे काय? किती गमजा मारता..! अशा शब्दात नरेंद्र परदेशी यांनी आ. अनिल गोटे यांच्यावर शरसंधान केले आहे.
या प्रश्नांची मागितली उत्तरे…
आ. गोटेंच्या बेलगाम वक्तव्यांचा समाचार घेतांना त्यांनी विविध संदर्भ देत, ‘नामदेव भोसलेंना 3 वर्षे हलू देणार नाही. विरोधकांच्या तीन पिढ्या खाली आल्या तरी चौपाटी पडणार नाही. माझ्या कार्यालयाला बापाजन्मात हात लावता येणार नाही’ आणखी बरेच काही, पण काय झाले? भोसलेंची हकालपट्टी झाली, चौपाटी पडली आणि कार्यालय देखील जमीनदोस्त झाले. धुळेकरांचे नशीब इतके थोर की तुमचे महिलाराज महापालिकेत सत्तेवर आले नाही. अख्खे धुळे गिळंकृत करायला तुम्ही मागेपुढे पाहिले नसते. नाही तरी याच्या त्याच्या आडून 4-5 मोक्याच्या जागा जसे देव होस्टेलची जागा सौदेबाजी करुन लॅण्डमाफीयांच्या घशात तुम्ही घालणार होता. परंतु नगरसेवकांनी तुमचा कावा ओळखला नि महासभेत आलेले विषय तुमच्या तोंडावर परत मारुन फेकले. एका बेकायदा चौपाटीचे लाखो रुपये उत्पन्न बुडाले म्हणून 6 चौपाट्या उभारण्यासाठी पांझरा किनारी रस्त्यांचा घाट घातला. कशाची परवानगी नसताना महानगरपालिका मला नाकारते. जनता तुमचा एकही नगरसेवक निवडून पाठवत नाही. महापालिकेच्या जागा तुम्हाला हडपता येत नाही. म्हणून बरखास्तीची मागणी करता. तुम्हाला चांगली मंदिरे सहन होत नाही, शैक्षणिक संस्था सहन होत नाही. पुन:श्च आठवण करुन देतो.. पाणी योजनेचा भ्रष्टाचार का दडपून ठेवला, गुन्हे का दाखल होत नाही. विधीमंडळात तारांकित प्रश्न का विचारत नाही. ठेकेदाराने कितीमध्ये विकत घेतले नि कुठल्या तोंडाने 24 तास पाणी देण्याची भाषा करता चौक सभेत. याचे उत्तर द्या, असा जाहीर सवाल करणारे पत्रक नरेंद्र परदेशी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.