आ. जावळेंनी मांडला जळगावातील खड्ड्यांचा मुद्दा

0

जळगाव । जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या खराब रस्त्यांबाबत रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी विधानसभेत आवाज उठवला. जिल्ह्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे रस्ते अत्यंत खराब झाले असून तीन वर्षांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पैसेच मिळाले नसल्याचे जावळे यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात 8,383 किलोमीटर तर रावेर तालुकयातील 837 किमीचे रस्तेजिल्हा परिषद बांधकाम विभागात येतात. यामधील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात रस्त्याची स्थिती गंभीर असून सध्या सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे रस्ते वर्षानुवर्षे जैसे थे स्थितीत आहेत. या रस्त्यांवरून बैलगाडीची जाऊ शकत नसल्याचे जावळे यांनी सांगितले. या भागात केळीचे पीक मुख्य पीक आहे. यांच्या वाहतुकीसाठी रस्ते खराब असल्यामुळे केळी वाहतुकीवर परिणाम होत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यांचे तात्काळ नूतनीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी पुरवणी मागण्यात यासाठी व्यवस्था करावी अशी विनंती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना केली.

जिल्हा मार्गांवरील 83 टक्के खड्डे बुजविले; 30 जिल्ह्यांचा दौरा केला
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा विषय आमच्या खात्याच्या अखत्यारीत येत नाही, तो केंद्र सरकारचा विषय आहे. तसेच ग्रामीण रस्त्यांचा विषयही आमच्या अखत्यारीत येत नसून तो राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या अखत्यारीत येतो. ग्रामीण रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी ग्रामसडक योजना आणली असून, तिचे काम सुरू आहेच. माझ्या खात्याच्या अखत्यारीत येणार्‍या राज्य महामार्ग प्रकारातील व इतर जिल्हा मार्ग प्रकारातील रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे किती झाली हे पाहण्यासाठी मी स्वतः 30 जिल्ह्यांचा दौरा केला. त्यासाठी एक मोबाईल अ‍ॅपदेखील बनवण्यात आले असून, त्यावरून खड्डा बुजवण्याचे काम राहिले असल्यास फोटो पाठवून खात्याला माहिती देता येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.