पुणे : प्रतिनिधी : गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद या दोघांवर पुण्यातील विश्रामबाग पोलिस चौकीमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारवाडा येथे झालेल्या ’एल्गार परिषदे’त मेवाणी आणि खालिद यांनी चिथावणीखोर भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. जिग्नेश व उमर खालिद यांच्या भाषणाचा व्हिडीओ आणि ऑडिओ आमच्याकडे आहे. त्या दोघांचे भाषण तपासले जात असून, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी दिली.
पुण्यातील विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून कारवाई
पुण्यात राहत असलेल्या अक्षय बिक्कड या 22 वर्षीय विद्यार्थाने या दोघांसंबंधी पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती. उमर खालिद आणि मेवाणी यांनी ’एल्गार परिषदेत’ केलेल्या वक्तव्यामुळेचा दोन समाजांमध्ये वाद झाला आहे, असे अक्षय याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे दोन समाजांमध्ये वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या वक्तव्यामुळे पोलिसांनीदेखील भारतीय दंडविधान संहितेनुसार कलम 153 (अ), 505 व 117 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 31 तारखेला मेवाणी आणि खालिद याने ’एल्गार परिषदेत’ संघ आणि भाजपविरोधात टीका करत, समाजातील एका विशिष्ट समूहासंबंधी अत्यंत चिथावणीखोर असे भाषण केले होते. त्यानंतर एक तारखेला भीमा कोरेगाव येथील जमावावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्यामुळे राज्यामध्ये नवा जातीय’वाद’ पेटला होता.
गुन्हे दाखल करण्यास उशीर!
जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला का? या प्रश्नावर अप्पर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर म्हणाले, की 31 डिसेंबररोजी रात्री 10 वाजता कार्यक्रम झाल्यानंतर नववर्षाचा आणि त्यानंतर कोरेगाव भीमा येथील बंदोबस्त पोलिसांकडे होता. त्याचदरम्यान त्या ठिकाणी जाळपोळीची घटना घडली. तसेच त्याच्या दुसर्या दिवशी महाराष्ट्र बंद या चार दिवसाचा घटनाक्रम लक्षात घेता. या घटनेच्या सर्व बाबी तपासून पाहत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.