15 सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात इंजिनीअर्स डे साजरा करण्यात आला. आधुनिक भारताचे निर्माता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी इंजिनीअर्स डे म्हणून साजरा केला जातो,आपल्या समाजात इंजिनीअर्सला एकेकाळी खूप मान सम्मान, प्रतिष्ठा मिळत असे. इंजिनीअर्सचा रुबाब हा एखाद्या साहेबापेक्षा कमी नसायचा. यामुळेच की काय प्रत्येक विद्यार्थ्याला इंजिनीअरिंगचे क्षेत्र आकर्षित करत असते. मात्र, इंजिनीअरिंगचे हे रुबाबदार चित्र मागील काही वर्षांमध्ये पूर्णपणे बदलले आहे. इंजिनीअरिंगला स्कोप आहे या वाक्यात आता तेवढेच वजन आणि तथ्य आहे जेवढे तथ्य देशात अच्छे दिन येणार या वाक्यात आहे.शिक्षणाचे बाजारीकरण, पालकांच्या अपेक्षा, विद्यार्थ्यांची निष्क्रियता आणि डिग्री मिळाल्यानंतर होणारी नोकरीची वणवण यामुळे आजचे इंजिनीअरिंग क्षेत्र काळोखाकडे जाताना दिसत आहे. इंजिनीअरिंगच्या शिक्षणव्यवस्थेला बाजारीकरणाने वेढले असून यामुळे विद्यार्थ्यांना मप्रॉपर नॉलेजफ मिळत नाहीय तसेच प्रत्येक वर्षात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेले क्रेडिटवाले कठोर नियम, पेपर तपासणीस होणारा विलंब व त्यात दिले जाणारे कमी अधिक गुण यामुळे या इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात शिक्षण कमी आणि गोंधळच जास्त मांडला आहे. यामुळे की काय इंजिनीअरिंग क्षेत्राकडे आता विद्यार्थीवर्ग पाठ फिरवताना दिसत असून राज्यातील कॉलेजांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण हे दरवर्षी दुप्पटीने वाढत जात आहे.
इंजिनिअरींग कॉलेजांमध्ये ज्या जागा दरवर्षी भरल्या जातात त्यातही प्रत्येक विद्यार्थी हा स्वखुशीने आलेला नसतो.पालकांच्या दबावामुळे किंवा अमुक अमुक करतोय म्हणून आपणही इंजिनिअरींग करू आदी गोष्टींमुळेच बहुतेक विद्यार्थी हा इंजिनिअरींगचे क्षेत्र निवडतो.चार पाच वर्ष उठत पडत हा विद्यार्थी मग डिग्री पूर्ण करतो.इंजिनिअरींगची आवड नसताना बळजबरीने डिग्रीचा कुंकू लाऊन मग हा इंजिनिअर दुनियादारीत पडतो. मात्र हा इंजिनिअर नोकरीसाठी कितपत मलायकफ आहे ? हा विदारक प्रश्न उपस्थित होतोच.आजचे इंजिनिअर्स हे फक्त मकामयाबफ होण्यासाठीच शिकताना दिसतात.फकाबीलफ बनण्याचा प्रयत्नच करत नाहीत व याचे चित्र राज्यातील कोणत्याही इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दिसतेच. लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सदरम्यानची विद्यार्थ्यांची मानसिकता सर्वकाही स्पष्ट करते. याला काही अपवादही आहेत. मात्र ती संख्या खूप कमी असते. यामुळे की काय कामयाब झालेला. मात्र, काबील नसलेल्या इंजिनीअर्सला हातात डिग्री घेऊन कोणी नोकरी देतं का…नोकरी, असं म्हणत भटकावे लागत आहे.
एका सर्वेक्षणात हे सिद्धही झाले आहे. देशभरात 2012 ते 2016 दरम्यान, दरवर्षी फक्त 40 टक्केच इंजिनीअर्सना नोकरी मिळत असून महाराष्ट्रात तर फक्त 25 टक्केच इंजिनीअर्सना नोकर्या मिळत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. यावरून आजच्या इंजिनीअर्सची दुर्दशा समजते व या विषयाची भीषणता पुढील काही वर्षांमध्ये अधिक गडद होईल,यात शंका नाही.इंजिनीअर्सच्या या दुर्दशेवर विचार करण्याची वेळ आली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांवर जन्मताच इंजिनीअरचा शिक्का लावून आपले निर्णय लादू नये तसेच विद्यार्थ्यांनीही तंत्राज्ञानात आवड असेल तरच हे क्षेत्र निवडावे. फॅशन म्हणून हे करिअर निवडून आपल्या भविष्याशी खेळू नये.स्वतःची आवड, कौशल्य व क्षमता यांचा योग्य ताळमेळ राखूनच आपले शैक्षणिक क्षेत्र निवडावे, नाहीतर दरवर्षी इंजिनीअरिंगच्या फॅक्टरींमधून काबील नसलेले हजारो इंजिनीअर्स बाहेर पडत असून नोकरींची वणवण अधिकच तीव्र होत आहे व नोकरीची कोणतीही हमी नसताना हजारोंच्या संख्येने तयार होत असलेल्या या इंजिनीअर्सला बघून आता इंजिनीअर एके इंजिनीअर म्हणण्याची वेळ आली आहे.
– स्वप्निल सोनवणे
जळगाव
7507728977