इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

0

जळगाव । समाजोपयोगी विविध कार्यांमध्ये अग्रेसर राहणार्‍या जळगाव जिल्हा रेडक्रॉस सोसायटीच्या शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा राज महाराजसिंग फिरता चषक आणि सन्मान स्मृति चिन्ह पुरस्कार देऊन गुरुवारी मुंबई येथे गौरविण्यात आले. राज्यातील रेडक्रॉस सोसायटीच्या असलेल्या 33 शाखांमध्ये जळगाव जिल्हा रेडक्रॉस शाखेला हा मान मिळाला. तर द्वितीय क्रमांकाचा एन.सी.पुरी पुरस्कार पुणे जिल्हा रेडक्रॉसला मिळाला.

जळगावकरांना केला समर्पित
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपून रक्तदान कार्यात महत्वाची कामगिरीसह इतर अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या जिल्हा रेडक्रॉस सोसायटी हि सातत्याने महत्वाचे कार्य करीत आली आहे . 2015 ते 2017 या कार्यकाळातील कार्याची दखल राज्य रेडक्रॉस सोसायटीने घेत मुंबई येथे गुरुवार 10 मे 2018 रोजी संस्थेच्या वार्षिक बैठकीत हा पुरस्कार राज्य चेअरमन के.एम. गरडा, व्हाईस चेअरमन सुरेश देवडा, कोषाध्यक्ष मिली गोलवाला, जनरल सेक्रेटरी टी.बी. सकलोत यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे जळगाव जिल्हा पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्यावतीने रेडक्रॉसचे सचिव विनोद बियाणी, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी , सहसचिव राजेश यावलकर आदींनी पुरस्कार स्वीकारला. रेडक्रॉसच्या पदाधिकार्‍यांनी हा सन्मान सर्व रक्तदान शिबीर आयोजक, सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सर्व सेवार्थी जळगावकरांना समर्पित केला आहे.