इंदापुरातील लाचखोर पोलिसाला अटक

0

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई

इंदापूर : तक्रारदार यांच्या भावासह इतर तीन जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला जामीनदार  मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहुल बडे यांनी 25 हजारांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. राहुल दत्तात्रय बडे (वय 30) असे त्याचे नाव आहे.

बडे याने तक्रारदाराला पैसे घेऊन प्रथम इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बोलावून घेतले. त्यांनतर त्याला स्वत:च्या बुलेट गाडीवर घेऊन प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलच्यासमोर घेऊन गेला व त्याच्याकडून 25 हजार रुपये स्वीकारून तक्रारदाराला तेथेच सोडून इंदापूर पोलीस ठाण्याकडे निघून आला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना इंदापूर पोलीस ठाण्यासमोर तपासले असता त्यांच्या बुलेट गाडीच्या डिक्कीमध्ये 25 हजारांची रक्कम आढळून आली व त्यांना जागीच चौकशीसाठी पथकाने ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस निरीक्षक घार्गे, सहायक पोलीस निरीक्षक ढवणे, पोलीस नाईक कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल म्हेत्रे यांनी केली. या कारवाईसाठी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी सहकार्य केले.