इंदापुरात आजपासून रंगणार शरद युवा महोत्सव

0

इंदापुर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून इंदापुरातील विद्या प्रतिष्ठाच्या कॅम्पसमध्ये शरद युवा महोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून या महोत्सवाला सुरुवात होणार असून शनिवारी समारोप होणार आहे. विद्या प्रतिष्ठान हे या महोत्सवाचे सहआयोजक असल्याची माहीती राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील व समन्वयक निलेश राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

शुक्रवारी दुपारी 12 वाजता बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ फेम अजिंक्य व शितल हे आघाडीचे स्टार कलाकार या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

विविध स्पर्धांचे आयोजन

या महोत्सवात बारामती, इंदापूर व दौंड या तीन तालुक्यातील तीन हजाराहून अधिक युवा कलाकार सहभागी होणार आहेत. 12 विविध प्रकारात या स्पर्धा संपन्न होणार आहेत. शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासूनच महोत्सवाला सुरुवात होणार आहे. सकाळी 8 ते 12 वयैक्तीक वाद्य वादन स्पर्धा, दुपारी 2 ते रात्री 9 या वेळेत वैयक्तिक गायन स्पर्धा, मूकअभिनय स्पर्धा व प्रहसन स्पर्धा संपन्न होणार आहेत. तर त्याच दिवशी पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत काव्य वाचन स्पर्धा, कॉमर्स, सायन्स कॉलेज विद्या प्रतिष्ठान येथे दुपारी 2.30 ते 4 या वेळेत निबंध स्पर्धा संपन्न होणार आहेत.

शनिवार सकाळी 8 ते 11 या वेळेत इंदापूर नगरपरिषदेच्या मैदानात छायाचित्र स्पर्धा, दुपारी 12 ते 5 या वेळेत ढोल ताशा स्पर्धा, त्याच दिवशी विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलच्या मैदानावरील मुख्य रंगमंचावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वैयक्तीक व समूह नृत्य स्पर्धा, तर वेळेत विद्या प्रतिष्ठाण कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी 6 वाजता खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आल्याची माहीती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील व समन्वयक निलेश राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.