इंदापुर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींचा होणार विकास

0

इंदापूर । तालुक्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या एकूण दहा ग्रामपंचायतींना सुमारे 88 लाख 88 हजार 800 रुपयांचा भरीव निधी पुणे जिल्हा परीषदेच्या माध्यमातून जनतेला नागरी सुविधा पुरविण्यासाठी देण्यात येणार असल्याची माहीती इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. यामध्ये पळसदेव, निमसाखर,भिसेवाडी, बेलवाडी, काटी, बोरी, मदनवाडी, वडापुरी, कळस, अंथुर्णे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या उपलब्ध निधीमध्ये संबधित ग्रामपंचायतींनी स्वतःचा दहा टक्के निधी टाकून गावाच्या विकास कामाचा आराखडा तयार करावयाचा असून, ग्रामसभेमध्ये तो आराखडा मंजूर करून जिल्हा परिषदेच्या मंजुरीसाठी पाठवायचा आहे. आराखडा मंजूर झाल्यानंतर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे तांत्रिक मान्यता घ्यावयाची आहे. या निधीच्या माध्यमातून गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमीगत गटारे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, बाजारपेठ विकास, काँक्रिट रस्ते, ग्राम सचिवालय, बागबगीचा उद्यान तयार करणे आदी विकासकामे करावयाची आहेत.

निधी कमी पडून देणार नाही
गावाच्या मूलभूत गरजा आणि विविध विकासकामे करण्याविषयी ग्रामपंचायतीने समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा विचार करून, गाव हे आपलं कुटुंब समजून गावाचे सामाजिक ऐक्य, सलोखा आणि विकासकामाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण या संदर्भात प्राधान्याने पुढाकार घेऊन शासनाच्या उपलब्ध योजना राबविण्यात याव्यात, निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्‍वासन भरणे यांनी दिले.