इंदापूरची जागा काँग्रेसच लढवणार!

0

इंदापूर । विधानसभेची निवडणूक मी तर लढवणारच. माझ्या इंदापूर मतदार संघातील विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारीचा निर्णय घेण्यास आमचा काँग्रेस पक्ष सक्षम आहे. इतरांनी चिंता करण्याचे व मध्येच लुडबुड करण्याचे काहीच कारण नाही, असा टोला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लावला. पाटील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

30 एप्रिलला इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्या सभेत इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच घेणार त्यासाठी युती तुटली तरी बेहत्तर, असे अजित पवार यांनी सांगितले. यावर बोलताना पाटील यांनी इंदापूर काँग्रेसच लढविणार असल्याचे सांगितले. राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्या जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय आमच्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी घेणार आहेत, असे पाटल यांनी सांगितले.

इंदापुरात कलगीतुरा
अंथुर्णे येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करावा लागणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. यावर हर्षवर्धन पाटील यांनी जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगितले. विधान सभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरच इंदापुरात कलगीतुरा चालू झाल्याचे पाहायला मिळत आहे.