राजकीय वातावरण तापले; नेतेमंडळींचे दौरे वाढले : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
सुधाकर बोराटे
इंदापूर : खासदार सुप्रिया सुळे या गेल्या अनेक वर्षापासून बारामती लोकसभेच्या खासदार म्हणून इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करताना सलग वीस वर्षे राज्याचे मंत्रीपद उपभोगलेले आहे. तर राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे गेल्या चार वर्षापासून इंदापूर तालुक्याचे नेतृत्त्व करत आहेत. असे असूनही गेल्या कित्येक वर्षापासून इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पाणी प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. एकाही आमदार किंवा मंत्र्याला ते ठामपणे सोडवीता आले नाही. परंतु खोट्या आश्वासनांचे गाजर दाखवून वर्षानुवर्षे याच प्रश्नांवर इंदापूर तालुक्यातील जनतेची फसवणूक करून मते मिळवली आहेत. निवडणूक जवळ आली की 22 गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची खोटी आश्वासने तालुक्यातील जनतेला दोन्ही पक्षाकडून दिली जात आहेत. विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारून न केलेले काम मीच करून आणले हे जनतेला पटवून देण्यासाठी भूमीपूजन, विविध समारंभातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे दिसते. श्रेय घेण्यासाठी भांडणार्यांनो विकासासाठी कधी भांडणार, असा खरमरीत प्रश्न सध्या तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे.
कामाचे श्रेय घेण्यासाठी नेतेमंडळींची लागलीय चढाओढ
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यातच नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू करण्याची वेळ आली. शेतीला पाणी नाही. पाण्यावीना पिके जळून गेल्याने शेतकर्यांसमोर दुष्काळ आ वासून उभा ठाकला आहे. पावसाळ्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच 2019 ची विधानसभा व लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी व भूमिपूजन, उद्घाटन यासाठी सध्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात नुसती चढाओढ लागली आहे. परंतु विकास कोणी किती केला व त्याचे श्रेय कोणी घ्यायचे या वादात त्यांना जनतेच्या दैनंदिन सुविधा, विकास कामांचे भानच राहिलेले नाही.
जनतेची दिशाभूल
विकासाऐवजी 22 गावांच्या पाणी प्रश्न संदर्भात तालुक्यातील नेते राजकारण करीत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील जनता आता हुशार झाली आहे. निवडणुकाजवळ आल्याने ते पुन्हा एकमेकांवर आरोप करत जनतेची दिशाभूल करत आहेत.जाणून बुजून पाण्याचा प्रश्न भिजत ठेवला आहे.
तालुक्यातील समस्यांकडे दुर्लक्ष
आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण करू नये. खासदार सुप्रिया सुळे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. परंतु जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याऐवजी हे नेते आपापसातच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून मीच कसा सर्वश्रेष्ठ व काम करणारा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागली आहे. श्रेयासाठी आपापसात आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा जनतेच्या कामासाठी या नेत्यांनी भांडावे, असा सूर इंदापूर तालुक्यातील जनतेतून निघत आहे. या प्रश्नामुळे आगामी विधानसभा व लोकसभा चांगलीच गाजणार असल्याचे दिसून येत आहे.