इंदापूर । पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ तरंगवाडी गावाच्या हद्दीत तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात 17 जण गंभीर जखमी असून, नऊ जण किरकोळ जखमी आहेत. आज (बुधवार) सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई येथून उमर रतन सुतार यांचे पार्थिव घेऊन रुग्णवाहिका व मिनी बसमधून (एमएच 04, एमके 1447) मयताचे नातेवाईक नागणेवाडी (ता. मंगळवेढा) येथे निघाले होते. इंदापूर बाह्यवळण रस्त्यावर सर्वजण लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने (टीएस 12 यूए 3613) मिनीबसला धडक दिली. त्यामुळे मिनीबस रुग्णवाहिकेवर जाऊन आदळली. या अपघातात मिनीबसमधील रियाज माणिक सुतार (वय 27) व कल्पना सुतार (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसचालक माणीक सुतार यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत आहे.
मुंबईतील रतन आप्पा सुतार हे त्यांच्या मुलाचा मृतदेह घेऊन त्यांच्या मुळगावी मंगळवेढा येथे चालले होते. त्यांच्यासोबत कुटुंबातील सर्व लोक मिनी बसमध्ये होते. इंदापूरजवळ आल्यावर अँब्युलन्स आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यातच पाठीमागून येणा-या ट्रकने मिनी बसला जोरदार धडक दिली. तर मृतदेह घेऊन जाणारी अँब्युलन्सही पलटी झाली. यात मिनी बसमधील चारजण जागीच ठार झाले. जखमीवर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.