इंदापूर । इंदापूर नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आठवडे बाजारास मुबलक मोकळी जागा उपलब्ध असतानाही दर रविवार भरणारा आठवडे बाजार नगरपरिषदेसमोरील पुणे- सोलापुर हायवेवर भरत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे स्थानिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. यानिमित्ताने नगरपरिषद प्रशासनाचा आणखीएक गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दर रविवारी इंदापूर नगरपरिषद मैदान व चाळीस फुटीरोडवर आठवडे बाजार भरत असून बाजारसाठी मोठ्या प्रमाणात जागा इंदापूर नगरपरिषदेकडे उपलब्ध असताना देखील प्रशासनाच्या गैरकारभारामुळे आठवडे बाजार पुणे-सोलापुर हायवेवर भरत आहे. आठवडे बाजार करवसुली पथक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. आठवडे बाजार भरल्यानंतर जागा, कर भाडे म्हणून नगरपरीषदेचे करवसूली पथकाचे तीन जणांचे टोळके करून बाजारात नुसत्या पावत्या फाडून व्यावसायिकांकडून जबरदस्तीने कर वसूली करते. यामध्ये अनेकांकडून कर, भाड्याच्या रूपाने पैसे घेतले जातात. परंतु त्यांना कर पावती दिली जात नसल्याने सक्तीने करवसूली करण्यात येत असल्याचे आनेक व्यावसायीक सांगत आहेत. जबरदस्तीने करवसुलीच्या नावाखाली खिसे भरण्याचा धंदा तेजीत सुरू असल्याने बाजार कुठे भरतोय, याकडे लक्ष देण्यास या कर्मचार्यांना वेळ मिळत नाही. परिणामी बाजार मात्र रस्त्यावर भरवला जात आहे. नगरपरिषद प्रशासकीय अधिकार्यांच्या हलगर्जिपणामुळे कर्मचारीही निर्ढावल्याने आठवडे बाजाराचा पुरता बट्याबोळ झाला आहे.
जड वाहतूक शहारातून
आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूक सूरळीत राहण्यासाठी पोलिसांची नेमणूक सुद्धा या या ठिकाणी केली जाते. परंतु पोलिससुद्धा केवळ बघ्याची भूमीका घेत असल्याने आठवडे बाजार मात्र भर रस्त्यात भरविला जात आहे. वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्मान झाल्याने या ठिकाणी दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे. अनेकवेळा छोटे-मोठे अपघातही घडत असल्याने इंदापुरकरांना मात्र मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बोलका नमुना येथे पहायला मिळत आहे. जड वाहतुकीला आळा घालण्यासाठी जड वाहतूक इदांपूर शहराच्या बाह्यवळण मार्गावरून वळविण्यात आलेली असतानासुद्धा बाजारच्या दिवशीही जड वाहतूक करणारी वाहने शहाराच्या मध्यवर्ती रस्त्याने जात असताना पोलीस दुर्लक्ष करत आसल्याने नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. यामुळे अपघाताची शक्यता मात्र मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. इंदापूर नगरपरिषदेचा हा गलथान प्रशासकीय कारभार कधी सुधारणार? याची वाट इंदापुरकर पहात आहेत. नगरपरिषद प्रशासनाला जाग केव्हा येणार? याचे उत्तर अजूनही मिळालेले नसल्याने इंदापूरकरांना मनस्तापच सहन करावा लागत आहे.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
नगरपरिषदेत लोकांची कामे करण्यासाठी जनतेतून नगरसेक म्हणून लोकप्रतिनीधी निवडले जातात व त्यांच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेद्वारे जनतेची व गावाच्या विकासाची कामे करण्यात येत असतात. परंतु निवडून दिलेले इंदापुरातील सर्व पक्षीय नगरसेवक आपापली इमेज जपण्यात दंग आहेत. गावाच्या विकासाचे किंवा समस्यांशी त्यांना काहीही देणे घेणे नसल्याचे मागील एक वर्षाच्या कारभारातून स्पष्ट होत असून नगरपरीषदेत विरोधी पक्षच राहीला नसल्याचे सध्याच्या कारभारावरून स्पष्ट दिसून येत आहे.