इंदापूरमध्ये जलयुक्तची 699 कामे पुर्ण

0

इंदापूर । बारामती उपविभागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देऊन कालमर्यादेत ती पूर्ण करावीत, अशा सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या आहेत. तर इंदापूर तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2016-17 साठी प्रस्तावित आराखड्यानुसार 699 पैकी 669 कामे पूर्ण झाली असून, 22 कामे प्रगतिपथावार आहेत. सन 2017-18 साठी 17 गावांतील प्रस्तावित आराखड्यानुसार 517 पैकी 72 कामे पूर्ण झाली असून, 30 कामे प्रगतिपथावार असल्याचे तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी सांगितले.

717 पैकी 65 कामे पूर्ण
यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, बारामती तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, इंदापूर तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बारामती तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान 2016-17 अंतर्गत 17 गावांतील 89 टक्के फोटो अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सन 2017-18 अंतर्गत 19 गावांतील प्रस्तावित आराखड्यानुसार 717 पैकी 65 कामे पूर्ण झाली आहेत. 56 कामे प्रगतिपथावर असल्याचे तालुका कृषी अधिकारी बरकडे यांनी सांगितले.

प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा
येथील उपविभागीय कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान व वृक्षलागवड आढावा बैठक प्रांताधिकारी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. निकम म्हणाले, सीएसआर फंडातून बारामती तालुक्यात ओढा खोलीकरणाचे मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. उपविभागातील जलसंधारणाच्या इतर कामांसाठी सीआरएस फंडातून निधी उपलबध करून देण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामांची छायाचित्रे तत्काळ ऑनलाइन अपलोड करावीत. तालुकानिहाय अधिकार्‍यांनी अभियानास गती देण्यासाठी आपापसात समन्वय ठेवावा, अशा सूचना निकम यांनी दिल्या. वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना वृक्षलागवड मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षांचे जतन करण्याच्या सूचनाही निकम यांनी यावेळी दिल्या.