इंदापूरमध्ये 28 नोव्हेंबरला मिनी मॅरेथॉन

0

इंदापूर । कांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा 127 वा स्मृतीदिन व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या स्मृृतीदिनाचे औचीत्य साधून इंदापुरातील सामाजिक संघटनांच्या वतीने मिनी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. ही मॅरेथॉन 5 किलोमीटरची असणार असून ती 28 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता इंदापूर नगरपरिषदेच्या मैदानात होणार असल्याची माहीती सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

महात्मा फुले सत्यशोधक प्रतिष्ठान, शाहु फुले आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तक्का फांउडेशन, युवाक्रांती प्रतिष्ठान, एच. के. जी. एन. ग्रुप, धनंजय बापु वाशिंबेकर मेमोरियल फांउडेशन, डी. एल. एस. स्पर्धा परिक्षा केंद्र व इतर सर्व संघटनांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुला पुरूष, दहावीपर्यंतचे विद्यार्थी, इंदापुर तालुका शालेय विद्यार्थीनी दहावीपर्यंत आणि महिलांसाठी खुला गट, अशा चार गटात ही स्पर्धा होणार आहे. यासाठी 250 रुपयांचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोफत आहे. नगरपरिषदेच्या मैदानातून मॅरेथॉनला सुरुवात होणार असून सोलापुर हायवेमार्गे अंबाबाई मंदिर, टेंभुर्णी नाका, सावतामाळी कार्यालय, दर्गाह मस्जिद चौक मार्गे कुरेशी मस्जिद, बावडा वेस, आंबेडकर नगर, जोतीबा मंदीर, जुना अकलुज नाका, श्रीराम चौक ते संभाजी चौक मार्गे नेहरू चौक खडकपुरा मार्गे नगरपरिषद मैदान असा स्पर्धेचा मार्ग आहे. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाला 5 हजार, दुसर्‍याला 3 हजार, तिसर्‍याला 2 हजार, चौथ्याला 1 हजार, पाचव्या क्रमांकाला 500 रुपयाची रोख रक्कम, चषक आणि मेडल देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण समारंभ स्पर्धेच्या ठीकाणी एक तासानंतर होणार आहे. स्पर्धकांनी एक तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.