एका झाडापासुन 16 ते 18 किलो आयुर्वेदिक शतावरी मुळांचे उत्पादन
इंदापूर :- मधुमेह,रक्तदाब,गडघेदुखी,महिलांचे अंगावरील जाणे,कॅन्सर,संधीवात,केस गळती,डोळ्याचे विकार, शुगर,कोलेस्ट्रोल अशा विविध आजांरावर गुणकारी व उपयुक्त ठरणारी शतावरी औषधी वनस्पतीची शेती येथिल प्रगतशील शेतकरी धनाजी बाळकृष्ण सुर्वे यांनी पहिल्यांदाच लागण करून एक एकर क्षेत्रात विक्रमी साडेचौदा टन शतावरीचे उत्पादन घेतल्याची माहिती कृषितज्ञ देवा राखुंडे यांनी जनशक्तिचे प्रतिनिधी सुधाकर बोराटे यांचेशी बोलताना दिली.
धनाजी सूर्वे यांचे शेतातील शतावरी या पिकाचेे पूजन इंदापूर नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांचे हस्ते करून पिक काढणीस सुरूवात करण्यात आली.यावेळी इंदापूर पोलीस स्टेशन गुप्त वार्ता विभागाचे एपीआय सातव,हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.तर कंपनीचे सीएमडी बबनराव पवार,डॉ. प्रदिप निकुंभ,विशाल चव्हाण, नितीन आरडे,राजेंद्र वाघमोडे,इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
सरकारचे अनुदान
आयुष मंत्रालय भारत सरकार यांचे अतर्गत स्थापन केलेल्या आयुष मिशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने सुगंधी व औषधी वनस्पती लागवड अभियान राज्यात सन 2013 पासुन राबविण्यात येत आसुन सुमारे 68 सुगंधी व औषधी वनस्पतीसाठी भारत सरकार एकूण खर्चाचे 30 ते 75 टक्के पर्यंंत अनुदान दिले जात जात आहे. शतावरी पासुन बिस्किट,कल्प,चॉकलेट चिक्की,वटी,ज्युस,ग्रहत,आईस्क्रिम आदी प्रक्रियायुक्त पदार्थ बनविता येतात.
अंतरपिकांच्या लागवडीतूनही नफा
सुर्वे यांनी एक एकर शेतात दोन गादी वाफे तयार केले. त्यावर 30 रूपयाला एक रोप या प्रमाणे 1250 रोपे आयुर्वेदिक शतावरी पिक लागवड केले आहे. लागन केल्यापासुन ते पिक काढणीपर्यंत एकूण 70 हजार रूपये खर्च आला असुन 12 महिन्यात शतावरी या पिकात अंतरपिक म्हणून हिरव्या मिरचीचे 2 लाख 84 हजार, तर कलिंगड46 हजार,कांदा पिक 72 हजार,असे एकूण 4 लाख 52हजार रूपयांची आंतरपिके घेतली.यामध्ये सर्व खर्च वजा जाता 2 लाख 50 हजार रूपयांचा नफा अंतरपिकातुन मिळाला.
एकरी नऊ लाख उत्पन्न
तर शतावरीचे पिकाची काढणी सुरू केली असून सध्या 9 टन माल निघाला आहे. तर साडेपाच टन माल निघणे बाकी आहे. या पिकाला थेट बाजारपेठेत ग्राहक नसल्याने कंपनी तर्फे करार करून या पिकाची विक्री करण्यात येते. सुर्वे यांनी 24 कॅरेट या कंपनीशी 3 वर्षाचा करार केला असुन प्रती टन 50 हजार रूपये दराने माल कंपनीने घेण्याचा करार केलेला आहे.सध्या 9 टन माल कंपनीने नेला आहे.तर आणखी साडेपाच टन माल निघने अपेक्षीत असून सव्वा सात लाख रूपये शतावरी पिकातुन ऊत्पन्न सुर्वे यांना मिळाले आहे. त्यातुन 70 हजार रूपये खर्च वजा जाता 6 लाख 55 हजार शतावरी पिकातुन व 2 लाख 50 हजार अंतरपिकातून उत्पन्न असे एकूण 9 लाख रूपये उत्पन्न एक एकर शतावरी पिकापासुन एक वर्षात मिळाल्याचे धनाजी सुर्वे यांनी सांगीतले.