स्वच्छता मोहीम, वॉल पेंटींग, वृक्षारोपणामुळे चेहरामोहरा पलटला
इंदापूर । इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील नारायणदास रामदास शहा चॅरीटेबल ट्रस्ट, शहरातील विविध 18 कलाकारांनी (पेंटर), ब्रिस्क प्रायव्हेट कंपनी आणि नगरपरिषदेच्या वतीने बसस्थानक परिसरात स्वच्छता, वॉल पेंटींग तसेच वृक्षारोपण करून बसस्थानकाचा चेहरामोहरा पालटवला. बसस्थानक चकाचक झाल्याचे पाहून प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
स्वच्छतादूत, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि कलाकार, समाज व राष्ट्रहितासाठी स्वच्छतेची जनजागृती सर्वदूर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. वॉल पेंटींगच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. सुविचार व स्थलचित्र भिंतींवर काढली आहेत. सुशोभीकरणासाठी वृक्षारोपण केले आहे. रचना बाजारमधील दुकानदारांना नगरपरिषदेच्या वतीने डस्टबीनचे वाटप करण्यात आले. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर यावेळी उपस्थित होते. सर्व व्यापारी वर्गाने स्वच्छतेसाठी डस्टबीनचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले आहे.