जूनपासून पदभार स्वीकारणार
नवी दिल्ली : पेप्सिकोच्या चेअरमन आणि सीईओ इंदिरा नुई यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी)च्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. येत्या जून महिन्यापासून त्या संचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्याचा निर्णय आयसीसी परिषदेने गेल्यावर्षी जून महिन्यात घेतला होता. नुई या उद्योग जगतातील एक परिचित नाव आहे. जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांमध्येही त्यांची गणना होते.
उत्तम कारभाराच्या दिशेने पाऊल
आयसीसीने जून 2017मध्ये स्वतंत्र संचालकपदाच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली होती. या प्रस्तावातील स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्यात यावा, ही अटही आयसीसीने मान्य केली होती. नुई यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली असली तरी, त्यांची पुनर्नियुक्तीही केली जाऊ शकते. आणखी एक स्वतंत्र संचालक नियुक्त करणे आणि तेही या पदावर महिलेची नियुक्ती करणे म्हणजे उत्तम कारभार करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिली आहे. या पदासाठी योग्य व्यक्तीची निवड व्हावी म्हणून आयसीसीने जगभर शोध घेतला होता. या पदावर नियुक्त होणारी व्यक्ती ही क्रिकेटप्रेमी, उद्योगक्षेत्राचा अनुभव असलेली, तसेच आयसीसी किंवा शासकीय संस्थांशी संबंधित नसणारी असावी अशा आमच्या अटी होत्या. नुई या सर्व अटी पूर्ण करणार्या उमेदवार होत्या. आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत, असेही मनोहर म्हणाले.
मला क्रिकेटची आवड आहे आणि मी कॉलेजला असताना क्रिकेट खेळली आहे. या जबाबदारीसाठी आयसीसीशी जोडली गेलेली पहिली महिला म्हणून मी आनंदी आहे.
– इंद्रा नुई, नवनियुक्त आयसीसी संचालक