नगराध्यक्षांनीही केला एक प्रकारे इंधन दरवाढीचा निषेध ; जाणकारांचे मत
भुसावळ (विजय वाघ)- सलग 15 दिवसांपासून इंधनाच्या किंमती वाढत असल्याने सर्वसामान्य जनता महागाईने बेजार झाली असतानाच वरणगाव पालिकेतील सत्ताधारी भाजपाचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनाही इंधन दरवाढीचा फटका सोसावा लागला. मोजक्याच पैशांचे पेट्रोल टाकल्याने त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल शहरातील रस्त्यावर संपल्याने त्यांना दुचाकी पेट्रोल पंपापर्यंत ढकलत नेण्याची वेळ आली. त्यांचा हा प्रसंग पाहून इंधन दरवाढीचा एक प्रकारे भाजपा नगराध्यक्षांनी निषेध व्यक्त केल्याची काही जाणकारांनी भावना व्यक्त केली.
15 दिवसांपासून सलग दरात वाढ
राज्यात सलग पंधरा दिवसापासून सतत पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये वाढ होत आहे. पंधरा दिवसाच्या कालावधीत पेट्रोलच्या दरांमध्ये तीन रूपये 64 पैशांनी वाढ झाली आहे. शिवाय ही दरवाढ सुरूच असल्याने वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सर्व स्तरातून इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त होत आहे. इतकेच नव्हेतर सोशल मिडीयावर तर इंधन दरवाढीमुहे सत्ताधारी भाजप पक्षाचे कार्यकर्ते, विरोधी पक्ष आणि इंधन दरवाढीमूळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांमध्ये चांगलाच कलगीतूरा रंगताना दिसून येतो. यामध्ये आरोप -प्रत्यारोप होत असल्याने नागरीकांचे मनोरंजन होत आहे.वाहनधारकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने काही वाहनधारक उद्या पेट्रोलचे दर कमी होतील या आशेने आपल्या वाहनात मोजक्याच रकमेचे पेट्रोल टाकून पुढील प्रवासाला निघत आहे मात्र अल्पशा रकमेचे टाकलेले पेट्रोल वाटेतच संपून जात असल्याने दुचाकी वाहनधारकांवर आपली दुचाकी ढकलत नेण्याची वेळ येत आहे. अशा प्रसंगी पेट्रोलचे दर वाढल्याने मार्गावरील दुसरा दुचाकी वाहनधारकही पेट्रोल देण्यास थांबत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
नगराध्यक्षांवर आली दुचाकी ढकलण्याची वेळ
वरणगाव नगरपालिकेचे भाजपा नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यावर दुचाकी ढकलण्याचा प्रसंग ओढवला. त्यांनी आपल्या दुचाकीत अल्पशा रकमेत टाकलेले पेट्रोल शहरातील रस्त्यावरच संपल्याने त्यांच्यावर दुचाकी पेट्रोल पंपापर्यंत ढकलत नेण्याची वेळ आली. याप्रसंगी त्यांच्या सोबत भाजपाचे माजी सरपंच सुकलाल धनगर, माजी ग्रामपंचायत सदस्य अजय पाटील व शहरातील प्रतिष्ठीत भाजपा समर्थक व्यापारी यांनीही पेट्रोल पंपापर्यंत त्यांना पायी चालत साथ देवून निषेध नोंदवल्याची चर्चा सुरू असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
एक प्रकारे इंधन दरवाढीचा निषेध
दिवसेंदिवस इंधनाच्या दरामध्ये वाढ होत असल्याने वाहनधारक बेजार होत आहेत. याचा फटका नगरपालिकेतील भाजपाचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनाही बसला. त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने त्यांनी सर्वसामान्य वाहनधारक प्रमाणेदुचाकी पेट्रोल पंपापर्यंत ढकलत नेल्याने अनेकांचे त्यांच्या या कृतीकडे लक्ष वेधले गेले. यामुळे नगराध्यक्ष काळे यांनी एक प्रकारे आपल्याच सत्ताधार्यांचा निषेध केल्याची भावना काही जाणकारांनी व्यक्त केली.
सोशल मिडीयावर आरोप -प्रत्यारोप
इंधन दरवाढीचा सर्वचस्तरातून निषेध व्यक्त केला जात असून सोशल मिडीया वरील व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर तर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यामध्ये सत्ताधार्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात त्यांना गोचीत पकडण्याचा विरोधकाकडुन प्रयत्न केला जात आहे. अंध भक्त मात्र पेट्रोल दर वाढीचे समर्थन करीत असताना भक्तांसाठी 200 रुपये लीटर व सर्वसामान्यांसाठी 50 रुपये लीटर दर ठेवावेत, अशी खोचक टीकाही विरोधक करताना दिसून येत आहेत.