मुंबई- इंधन दरवाढीचा निषेध करत आज काँग्रेसने भारत बंदची हाक दिली. शिवसेनेनेकडून देखल इंधन दरवाढीला विरोध केला जात आहे. मात्र आजच्या बंदमध्ये शिवसेनेने सहभाग घेतलेला नाह. देशात आणि महाराष्ट्रात या बंदला प्रतिसाद मिळत असताना राज्याचे सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झालेले पहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात आले होते.
भारतीय पोस्ट विभागातर्फे सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला. या सोहळ्यासाठी हे दोन नेते एकत्र आले होते. भारतीय पोस्ट विभागातर्फे माय स्टॅम्प ही योजना करण्यात आली. या योजने अंतर्गत कोणत्याही व्यक्तीस आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, मित्राचा, नातेवाईकाचा फोटो सिद्धिविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी मिळणार आहे.
सामनातून उद्धव ठाकरेंनी इंधन दरवाढीचा निषेध करत टीकास्त्र सोडलेले असले तरीही सोमवारी हे दोन्ही नेते सिद्धिविनायक मंदिरात एकत्र आलेले बघायला मिळाले. त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात विरोधक रस्त्यावर आणि सत्ताधारी सिद्धिविनायकाच्या चरणी पाहायला मिळाले.