इक्बाल कासकरचे राष्ट्रवादी कनेक्शन?

0

मुंबई : मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याने अटक केली आहे. या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून, या दोन नेत्यांपैकी एक नगरसेवक आहे. ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनीही खंडणी टोळीत राजकारण्यांची नावे असल्याची शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकरला ठाणे न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ
खंडणीप्रकरणात राष्ट्रवादीच्या दोघांचे नाव असल्याचे समजत असले तरी संबंधीत दोन दोघांची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, तसेच त्यांची नावे याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही. आरोपींनी चौकशीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नावे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणात सोमवारी रात्री बेड्या ठोकल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. इक्बाल कासकरने बिल्डरकडून खंडणी म्हणून 4 फ्लॅटची मागणी केली होती. ही टोळी दाऊद चालवत असल्याची शंका आहे. यामध्ये काही राजकीय व्यक्तींचीही नावे आहेत, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली. सिंह यांनी दाऊदच्या खंडणी टोळीत थेट राजकारण्यांची नावे असल्याची शंका व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, इक्बाल कासकर खंडणीचे रॅकेट चालवत होता. त्याला बहिण हसिना पारकरच्या घरातून अटक केली.

ड्रग तस्करीच्या दिशेनेही तपास
सोमवारी रात्री ठाणे पोलिसांच्या एटीएसने घरी जाऊन त्याला अटक केली. कासकर तक्रारदाराला 2013 पासून खंडणीसाठी धमकी देत होता. तक्रारदाराने 2016 पर्यंत कासकरला चार फ्लॅट्स आणि रोख रक्कम दिली. पण त्यानंतर त्याने आणखी पैसे देण्यास नकार दिला. इक्बालने 4 फ्लॅट्स आणि 30 लाख रोख अशी खंडणी मागितली होती. अखेर सोमवारी रात्री त्याने याबाबत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर इक्बालला बेड्या ठोकल्या. इक्बाल कास्करसोबत त्याच्या बहिणीचा दीर इकबाल पारकर, मोहम्मद हुसैन ख्वाजा शेख (ड्रग डीलर), फर्नांडो असे आणखी तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मकोका लावण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. खंडणीच्या या रॅकेटमध्ये दाऊदचा समावेश आहे की नाही ते तपासले जात आहे. प्रमुख आरोपी इक्बाल कासकर हा ड्रग अ‍ॅडिक्ट आहे. ड्रग डिलर-ड्रग तस्कर ख्वाजा शेखला त्याच्यासोबत अटक केल्याने ड्रग तस्करीच्या दिशेनेही तपास सुरु आहे.