इतरांना आनंद दिल्याने मिळतो आंतरिक आनंद : डॉ. मालपाणी

0

कोथरुड । माणूस स्वत:चे आयुष्य अनेकदा दुसर्‍यांच्या भावनांवर अवलंबून ठेवतो. परंतु स्वत:च्या आयुष्याच्या रिमोट कंट्रोल स्वत:च्या हातात ठेवा. आपल्या आयुष्यात सुख, दु:ख, हार, जीत हे येणारच आहेत. पण या सगळ्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आयुष्यात समतोल येईल, तेव्हाच आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेल. ज्या गोष्टीमधून आंतरिक आनंद मिळेल तीच गोष्ट आयुष्यात करा. आपल्या आयुष्यातील आनंद इतरांना दिल्याने स्वत:ला देखील आंतरिक आनंद मिळेल, असे मत गीता परिवारचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी व्यक्त केले. वनबंधु परिषद एकल अभियानतर्फे जिंदगी एक सुहाना सफर या व्याख्यानाचे आयोजन कोथरूड येथील बालशिक्षण सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत बोलत होते.

…तर होईल प्रगती
जीवनात शिक्षण खूप महत्त्वाचे असून त्यामुळेच प्रगती होणार आहे. आयुष्यात यशाची प्राप्ती करण्यासाठी मन स्थिर असणे आवश्यक आहे. माणसाने आपल्या मनातील काम, क्रोध, मत्सर या भावना घालवून त्या जागी करुणा, प्रेम, दया हे भाव आणले तर नक्कीच त्याची प्रगती होईल. स्वत:मधील अवगुण दूर केले आणि चांगल्या गुणांचा स्वीकार केला तर नक्कीच लक्ष्मी तेथे वास करेल, असे ब्रह्मरतन अगरवाल यांनी सांगितले. ज्यांचे आयुष्य अंधकारमय झाले आहे. अशा लोकांचे आयुष्य प्रकाशमान केले तर आपले जीवन सार्थकी लागेल, असे अंजली तापडीया यांनी सांगितले.

आनंद असतो आंतरिक
आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट करताना त्या गोष्टीमध्ये आपले सुख आहे की आनंद आहे हे शोधले पाहिजे. कारण सुख फक्त वरवरचे असते आणि आनंद हा आंतरिक असतो, असे डॉ. मालपाणी यांनी सांगितले. ब्रह्मरतन अगरवाल, रामेश्‍वरलाल काबरा, रत्नीदेवी काबरा, बजरंग बागरा, वसंत राठी, अंजली तापडीया आदी उपस्थित होते.