चिंचवडगावातील शहीद भगतसिंग व्याख्यानमालेस प्रारंभ
ज्येष्ठ विचारवंत रत्नाकर महाजन यांचे मत
चिंचवड : ‘भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भगतसिंग यांचा हिंसक क्रांतीचा मार्ग आणि महात्मा गांधींची अहिंसावादी चळवळ हे दोन्हीही प्रयत्न योग्य होते; परंतु ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीचाही संबंध नाही असे काही लोक इतिहासाचे विकृतीकरण करतात, तेव्हा त्याचा प्रतिवाद निश्चितपणे केला पाहिजे!’, असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ.रत्नाकर महाजन यांनी काकडे पार्क चौक, चिंचवडगाव येथे केले.
नेत्रसेवा प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय शहीद भगतसिंग व्याख्यानमालेस बुधवारी प्रारंभ झाला. यामध्ये महाजन यांनी ‘भगतसिंगांचा आर्थिक विचार व सध्याची आर्थिक परिस्थिती’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे होते. यावेळी तसेच नागरी हक्क सुरक्षा समिती संस्थापक मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, महात्मा फुले मंडळ अध्यक्ष हनुमंत माळी, उद्योजक संतोष मोहिते, नितीन डांगे-पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
भगतसिंगाचे आजही सुसंगत
महाजन म्हणाले की, इतिहासाविषयी परस्परविरोधी मतप्रवाह विचारवंतांमध्ये आढळतात. त्यामुळे इतिहासातील मढी उकरून काढून आज त्याचे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ऐतिहासिक घटनांचा नीरक्षीरविवेकाने विचार केला पाहिजे. उण्यापुर्या चौतीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भगतसिंगांवर नकळत्या वयापासूनच रशियन राज्यक्रांती, लेनिन आणि मार्क्सवादाचा प्रभाव पडलेला होता. धार्मिक मूलतत्त्वांचे मूळदेखील आर्थिक असते, असे मार्क्सवाद मानतो. भारतासारख्या विविध जाती-धर्माच्या देशात आर्थिक समानता असावी, असे भगतसिंग यांना वाटायचे. त्यामुळे लाहोर, पंजाब येथे शेती आणि उद्योग या क्षेत्रात आर्थिक समानता यावी या उद्देशाने त्यांनी सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. शेती आणि कारखाने यांचे मालक जरी वेगळे असले तरी शेतमजुराला आणि औद्योगिक कामगाराला उत्पादनात वाटा मिळाला पाहिजे, असे भगतसिंग यांचे तत्त्व होते. त्या संदर्भात भगतसिंग यांनी केलेले कार्य आजदेखील सुसंगत वाटते. मार्क्सवादाच्या सिद्धांतानुसार शेतजमीन ही खाजगी न राहता तिची मालकी सार्वजनिक व्हावी या तत्त्वाचा भगतसिंग यांनी पुरस्कार केला; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
स्वातंत्र्यासाठी जहाल क्रांतीचा मार्ग
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भगतसिंग यांनी हिंसक क्रांतीचा मार्ग स्वीकारला असला तरी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी त्यांच्या मनात नितांत आदर होता. आपला जहाल क्रांतीचा मार्ग सर्वानीच स्वीकारावा, असा आग्रहदेखील भगतसिंगांनी कधी धरला नाही. भगतसिंग यांना फाशीची शिक्षा जाहीर झाल्यावर प्रचलित कायद्यानुसार त्यांना माफीविषयी विचारणा करण्यात आली होती; परंतु आपला हिंसक क्रांतीचा मार्ग योग्य असल्याचा विश्वास व्यक्त करून भगतसिंग यांनी ब्रिटिश सरकारची माफी मागण्यास ठाम नकार दिला.
फाशी टाळण्यासाठी काय प्रयत्न केले?
आज इंटरनेटच्या युगात विकीपीडियावरून उपलब्ध होणारी सगळीच माहिती खरी आणि अधिकृत असते असे म्हणता येणार नाही; कारण भगतसिंग यांच्या फाशीच्या वेळी महात्मा गांधी आणि आयर्विन यांच्यात करार झाला होता, त्यावेळी महात्मा गांधी यांनी भगतसिंग यांची फाशी टळावी म्हणून प्रयत्न का केले नाहीत असा खल आज केला जातो. मुळात भगतसिंग यांना आपल्या फाशीसाठी कोणी रदबदली करावी हे आवडले नसते, तरीदेखील फाशीच्या वेळी महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकारला त्याबद्दल पत्र लिहिले होते; परंतु त्या वेळच्या ब्रिटिश नोकरशाहीने त्या पत्राची दखल घेतली नाही. आज स्वातंत्र्याचा पुळका असलेल्या मंडळींनी गांधीना दोष देण्यापेक्षा त्यावेळी भगतसिंगांची फाशी टळावी म्हणून काय प्रयत्न केले, याची मात्र इतिहासात कोठेही नोंद आढळत नाही! अतिशय संयमित शैलीत डॉ.रत्नाकर महाजन यांनी विषयाची मांडणी केली.
आठ वर्षांपासून व्याख्यानमाला
नेत्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक आणि व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक प्रदीप पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून, महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या विचारांच्या प्रसारातून समाजप्रबोधन व्हावे या उद्देशाने शहीद भगतसिंग व्याख्यानमालेचे आठ वर्षांपासून आयोजन केले जाते! अशी संयोजनामागील भूमिका मांडली. व्याख्यानापूर्वी, अजित मळेकर यांनी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. मयूर जैस्वाल, प्रमोद शिंदे, मनोज फाटे, मानसी चिटणीस यांनी संयोजनात सहकार्य केले. सविता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास घुमरे यांनी आभार मानले.