इतिहासात पहिल्यांदा स्क्वॉशपटूंनी पटकविले पदक

0

मुंबई – दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा या भारताच्या अव्वल महिला स्क्वॉशपटूंना आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दीपिका व जोश्ना यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला स्क्वॉशपटूंनी एकेरीत दोन पदक जिंकण्याचा पराक्रम केला.

पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित मलेशियाच्या निकोल डेव्हीडने 3-0 अशा फरकाने दीपिकाला पराभूत केले. जोश्नाला चिवट झुंज देऊनही मलेशियाच्या 19 वर्षीय शिवसांगरी सुब्रमण्यमने 3-1 अशा फरकाने नमवले. त्यामुळे दोन्ही भारतीय खेळाडूंना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दीपिका ही 2014च्या आशियाई स्पर्धेत एकेरीत पदक जिंकणारी एकमेव भारतीय होती. आशियाई स्पर्धेतील दीपिकाचे हे सलग चौथे पदक आहे.

दीपिकाचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरे कांस्यपदक आहे. तिने 2014मध्येही कांस्यपदक जिंकले होते. जोश्नाचे हे एकेरीतील पहिलेच पदक ठरले. यापूर्वी तिने महिला सांघिक गटात एक कांस्य व एक रौप्यपदक जिंकले आहे. या दोन पदकांसह भारताने आशियाई स्पर्धेत स्क्वॉशमधील 10 ( 1 सुवर्ण, 2 रौप्य व 7 कांस्य) पदके नावावर केली आहेत.