इदाथोडिका, लिंगडोह करोडपती क्लबमध्ये

0

मुंबई । इंडियन सुपर लीगच्या रविवारी झालेल्या खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये बचावपटू अनस इदाथोडिका आणि मिडफिल्डर युजेंसन लिंगडोह सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. यावर्षी लीगमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या जमशेदपूर एफसीने इदाथोडिकासाठी आणि दोन वेळा ही स्पर्धा जिंकणार्‍या अ‍ॅथलेटिको कोलकाता संघाने लिंगडोहसाठी तब्बल एक कोटी 10 लाख रुपये मोजले आहेत. पहिल्या चार फेर्‍यांमध्ये गोलरक्शक सुब्रोतो पालसाठी जमशेदपूरने 87 लाख रुपयांची बोली लावली, तर राईट बॅक प्रीतम कोटलला दिल्ली डायनामॉज संघाने 75 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. लिंगडोहच्या खरेदीसंदर्भात अ‍ॅथलेटिको कोलकाता संघाचे प्रशिक्षक टेडी शेरिनघम म्हणाले की, लिगंडोहला आमची पहिली पंसती होती.

जमशेदपूर एफसीचे मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह कोपेल म्हणाले की, भारतीय खेळाडूंची निवड करण्याला आम्ही प्राधान्य दिले होते. परदेशी खेळाडूंबाबत निर्णय घेऊ. चांगल्या खेळाडूंची निवड केल्यामुळे संघाची ताकद वाढलेली आहे. मुंबई सीटी एफसी संघाने तिसर्‍या फेरीत स्ट्रायकर बलवंत सिंगला संघात घेतले. बलवंतसाठी त्यांनी 67 लाखांची बोली लावली.चौथ्या फेरीत मुंबईने गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यला 64 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. केरळ ब्लास्टर्सने 63 लाख रुपये मोजून रिनो एंटोला आपल्याकडे घेतले. एफसी गोवाने प्रणय हलदर आणि नारायण दास या दोंघाना प्रत्येकी 58 लाख रुपयांची बोली लावली. चेन्नईन एफसी संगाने थोई सिंगला संघात घेण्यासाठी 57 लाख रुपये खर्च केले. खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये पहिल्या चार फेर्‍यांमध्ये एकूण 24 खेळाडूंना खरेदीदार मिळाले.