‘इनकमिंग’मुळेच पक्षात नव्या-जुन्यांचा संघर्ष!

0

प्रभाग स्वीकृत सदस्य निवडीपासून वाढली नाराजी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीत ‘इनकमिंग’वर जोर दिल्याने भाजपला निवडणुकीत प्रथमच सत्ता पण मिळाली. या ‘इनकमिंग’चा जसे फायदे झाले आहेत तसेच त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. भाजपमध्ये सध्या सुरू असलेला जुन्या-नव्याचा संघर्ष हा त्याचाच भाग आहे. प्रभाग स्वीकृत सदस्य निवडीपासून जुन्या कार्यकर्त्यांमधील नाराजी वाढली आहे. त्याचेच गा-हाणे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या दरबारी मांडताना जुन्या कार्यकर्त्यांनी कारभारी आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगेविरुध्द तक्रीरांचा पाढा वाचला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गंत गटबाजीला आणखी बळ मिळणार असून जुन्या-नव्यांचा संघर्ष सुरूच राहणार आहे.

दिग्गजांनीही धरली भाजपची वाट!
महापालिका निवडणुकीत भाजपने ‘वाल्याचा वाल्मिकी’ करण्याचे धोरण वापरून येईल त्याला सामावून घेतले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांसारख्या राजकीय दिग्गजांनीही भाजपची वाट धरली. जगताप-लांडगे या जोडगोळीने करिश्मा दाखवत भाजपला सत्ता आणून दिली. त्यावेळी पक्षाला बळ मिळाले म्हणून या दोघांचे गोडवे जुन्या कार्यकर्त्यांकडून गायले जात होते. पण, जगताप-लांडगे यांच्याबरोबर त्यांचे समर्थक पक्षात दाखल झाले होते. अनेकांना उमेदवारी मिळाल्याने नगरसेवकपदाची लॉटरी लागली. पण, दुसरीकडे उमेदवारीपासून ते आतापर्यंत आपल्याला काहीच मिळत नसल्याची भावना आहे.

त्यात नुकत्याच झालेल्या प्रभाग स्वीकृत सदस्य निवडीत दोन्ही आमदारांच्या समर्थकांना झुकते माप दिले गेले. नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणार्‍या अनेक निष्ठावंतांना प्रभाग स्वीकृत सदस्य ही शेवटची आशा होती. तिथेही स्थान न मिळाल्याने हा नव्या-जुन्यांचा सुप्त संघर्ष वाढीस लागला आहे. त्यामुळे आपल्याला डावलल्याचा आरोप करत आपल्याच पक्षाविरुध्द या कार्यकर्त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले.

कारभार्‍यांच्या तक्रारींचा वाचला पाढा
उपोषणामुळे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी मध्यस्ती करत या कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी संपर्क घडवून आणला. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अन्याय झाल्याचे गार्‍हाणे दानवे यांच्या दरबारात मांडले. पक्षात मनमानी कारभार सुरू असून निवड, नियुक्ती करताना जुन्या कार्यकर्त्यांना कुठेही विश्‍वासात घेतले जात नाही. या वरून थेट कारभारी दोन्ही आमदारांच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर दानवे यांनी दोन्ही आमदारांशी चर्चा करून अन्याय होऊन न देण्याची ग्वाही देत निष्ठावंतांच्या जखमेवर फुंकर घातली. परंतु, दानवेंकडील आमदारांच्या विरोधातील तक्रारींमुळे पक्षात गटबाजीला खतपाणी घातले जात असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे यापुढे भाजपमधील अंतर्गंत गटबाजीला आणखी बळ मिळणार आहे. त्याचा फटका येत्या काळात भाजपला बसू शकतो. त्यापूर्वी राज्यातील नेते मंडळींनी शहरातील राजकारणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.