इफ्तार पार्टी आयोजनावरून नवाब मलिक यांचा टोला
मुंबई :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इफ्तार पार्टी करावीशी वाटत असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वत: लोकांना निमंत्रण द्यायला हवे. आम्ही सगळे लोक जावू, त्यांचं स्वागतच करु.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हदयपरिवर्तन होत असेल तर त्यांचे स्वागतच आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इफ्तार पार्टी आयोजनावर लगावला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचच्यावतीने सहयाद्री सरकारी अतिथीगृहावर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. विदेशी दुतावासांना बोलावण्यात आले आहे. त्यांनी भारतातील लोकांना बोलवायला हवे होते. सरकारी अतिथीगृहामध्ये इफ्तार ठेवत आहेत. लग्न लावत आहेत आणि आता इफ्तार पार्टीचे आयोजन करुन विरोधही करत आहेत. परंतु कोणतीही व्यक्ती अशापध्दतीच्या इफ्तार पार्टीला विरोध करत नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हदय बदलत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही इफ्तार पार्टीचे आयोजन करावे आम्ही स्वागतच करु आणि आम्ही त्याठिकाणी हजर राहू असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले आहे.