महापालिका आयुक्तांकडे शिवसेनेची मागणी
चिंचवड : मोहननगर येथील रहिवाशी वसाहतीमध्ये एका तीन मजली इमारतीवर अनधिकृतपणे ‘नेटवर्किंग टाॅवर’ उभारण्यात आले आहे. दाट लोकवस्तीत असलेल्या या टॉवरमुळे नागरिकांना धोका संभावू शकतो. त्यामुळे या टॉवरवर त्वरित कारवाई करण्याची मागणी, शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिका आयुक्तांकउ निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत नगरसेविका यादव यांनी आयुक्तांना मागणीचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 14 मोहननगर परिसरातील तीन मजली असलेल्या एका इमारतीवर अनधिकृतपणे नेटवर्किंगचे लोखंडी टॉवर उभारण्यात आले आहे. हे टॉवर अतिशय धोकादायकरित्या उभारण्यात आले आहे. मोबाईल टॉवरच्या ध्वनी लहरीच्या प्रदूषणाचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
दाटवस्तीमध्ये असल्यामुळे त्याच्या नेटवर्क रेडिएशनमुळे आसपासच्या रहिवाशांना शारिरीक अपाय होण्याची संभावना आहे. त्यामुळे हे टॉवर हटविण्याची स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. नागरिकांना काही त्रास होण्याच्या अगोदरच हा टॉवर काढण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका यादव यांनी निवेदनातून केली आहे.