पॉवर हाऊससमोर आंदोनल सुरू
पिंपरी : कोणतीही सुनावणी न घेता संतोष सौंदणकर यांचा विद्युत ठेकेदारीचा परवाना रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि स्वतः कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर हे महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. केंद्र सरकारच्या इन्फ्रा टू या योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने आकसाने परवाना रद्द करण्यात आला आहे असा आरोप सौंदणकर यांनी केला. असोसिएशनच्यवतीने पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
हे देखील वाचा
महाराष्ट्र असोसिएशनचा पाठिंबा
सौंदणकर मालक असलेल्या न्यू सिमरन एंटरप्राइजेस या फर्मचा विद्युत ठेकेदारीचा परवाना मुख्य अभियंता यांनी कोणतीच सुनावणी न घेता रद्द केला. या कारवाई बाबत निवेदनेही देण्यात आली परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याकरिता दाद मागण्यासाठी उपोषणाला बसत आहोत असे निवेदनात म्हटले आहे. या उपोषणात अध्यक्ष गिरीश बक्षी, उपाध्यक्ष मनोज हरपळे, उपाध्यक्ष जावेद मुजावर, सचिव नितीन बोंडे, खजिनदार विशाल रोकडे आदी सहभागी झाले आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याची माहिती बोंडे यांनी सांगितली. शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे, आनंद कोराळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.