इलेक्ट्रिक बस खरेदीत कोट्यवधींचे नुकसान

0

काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांचा आरोप

पुणे : इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी नेमलेल्या सीआयआरटी या सल्लागार कंपनीने खोटी माहिती दिल्याने पीएमपीएमएलचे बस खरेदीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा महापालिकेतील काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. तसेच ओलेक्ट्रा या चायनीज कंपनीला हे काम मिळावे, असा हेतू ठेवूनच अहवाल तयार केल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

‘ओलेक्ट्रा’ला काम मिळणार असल्याची खात्री असल्याने त्या कंपनीने पीएमपीएमएलला सादर केलेले दर हे त्याच कंपनीने इतर शहरांमध्ये दिलेल्या दरापेक्षा खूप जास्त आकारले आहेत. याविषयी पीएमपीएमएलने सीआयआरटीचा अभिप्राय मागितला असता, त्यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

वर्क ऑर्डर रद्द करा

इतर शहरांना 9 मीटर बससाठी 1 कोटी रुपये अनुदान आहे, आणि पुणे शहरासाठी 50 लाख रुपये अनुदान असल्याने पीएमपीएमएलसाठी या कंपनीने दिलेली रक्कम योग्य असल्याचा अभिप्राय सीआयआरटीने दिला आहे. यावरून पीएमपीएमएलने चुकीच्या माहितीच्या अनुषंगाने सदर कंपनीला चढ्या भावात ई-बसची वर्क ऑर्डर दिली. सीआयआरटी सल्लागाराच्या चुकीच्या माहितीच्या आधारे वाढीव किंमतीची पीएमपीएमएलने दिलेली वर्क ऑर्डर रद्द करण्यात यावी आणि सीआयआरटी या सल्लागार संस्थेला काळ्या यादीत टाकून कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

कायदेशीर कारवाई करा

पीएमपीएमएलचे तत्कालिन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात या बसची ट्रायल घेण्यासाठी स्वारगेट येथे इलेक्ट्रिक बस आणली असता, त्यांनी ती बस योग्य नसल्याने नाकारली. याबाबतची सर्व कागदपत्रे पीएमपीएमएल प्रशासानाकडे उपलब्ध आहेत. ही सर्व माहिती असूनही याकडे दुर्लक्ष करून पुन्हा चुकीच्या पद्धतीने ट्रायल घेण्याचा घाट घातला जात आहे. पुणेकरांचे नुकसान करणारे पीएमपीएमएल संचालक मंडळ बरखास्त करावे आणि ई-बस खरेदी प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कायदेशीर कारवाई करावी. अरविंद शिंदे, गटनेता, काँग्रेस

‘ओलेक्ट्रा’ला काम देण्याचा घाट

याव्यतिरिक्त सीआयआरटी या संस्थेने पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बस खरेदी संदर्भात सर्व बस उत्पादक कंपन्यांची बैठक घेऊन बसची माहिती घेतली. ओलेक्ट्रा या चायनीज उत्पादक कंपनीकडे एका चार्जिंगमध्ये 250 किमी धावणारी बस असून, इतर सर्व भारतीय सात कंपन्यांकडे 100 ते 150 किमी धावणारी बस असल्याचे कळविण्यात आले. परंतु सीआयआरटीने पीएमपीएमएलला सल्ला देताना निविदा कागदपत्रे ओलेक्ट्रा कंपनीला काम मिळावे याच प्रकारे बनविली. यामुळे सदर कंपनीला कुठल्याही प्रकारे स्पर्धा न होता काम मिळाल्याचाही शिंदे यांचा आरोप आहे.