शिरपूर : तालुक्यातील वाठोडा शिवारात इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या 63 वर्षीय शेतकर्याचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 22 जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
भगवान हिरामण भोई (63, रा.वाठोडा, ह.मु.अरीहंत नगर, मांडळ शिवार, शिरपूर) असे मयत झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
शेतात लागला इलेक्ट्रीक शॉक
शिरपूर तालुक्यातील वाठोडा येथे भगवान हिरामण भोई यांची वडिलोपार्जित बागायती शेतजमीन असून शेतात कापूस पिकाची लागवड झाल्याने व अद्याप पाऊस पडला नसल्याने त्यांनी पिकास पाणी देण्यासाठी ते 22 जून रोजी शेतात गेले असता त्यांनी इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी हात लावला असता त्यांना जोरदार इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
थाळनेर पोलिसात नोंद
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावकर्यांनी धाव घेतली तसेच वाठोडा येथील पोलीस पाटील जितेंद्र चौधरी यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात व वीज वितरण कार्यालयात माहिती दिली. भोई यांना नातेवाईकांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.पवार यांनी तपासणी करून मयत घोषित केले. या प्रकरणी वार्डबॉय बीडी बोरसे यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास नाईक ललित खळगे करीत आहे.