इलेक्ट्रीक मोटारचा शॉक लागल्याने दुसखेड्याच्या तरुणाचा मृत्यू

0

यावल- तालुक्यातील दुसखेडा येथे सार्वजनिक नळाचे पाणी भरत असताना तोल जाऊन इलेक्ट्रिक मोटरवर पडल्याने 23 वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू झालची घटना सोमवारी दुपारी 12.30 वाजता घडली. आकाश राजेंद्र धायडे असे मृत तरुणाचे नाव आहे. दुसखेडा येथे सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सार्वजनिक नळाला पाणी आले असता आकाश राजेंद्र धायडे हा तरुण नळाला इलेक्ट्रिक मोटर लावून पाणी भरत होता. घरातील पाणी भरून झाल्यानंतर तो अंगणात पाणी शिंपडत असताना पाय घसरून तो इलेक्ट्रिक मोटरवर पडला. त्यात शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मोटारीचा वीजपुरवठा खंडित केला. मात्र, तोपर्यंत आकाश गतप्राण झाला होता. घटनेची माहिती मिळताच फैजपुरचे एपीआय दत्तात्रय निकम, हवालदार सुधाकर पाटील, सय्यद इक्बाल यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. सायंकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला. दरम्यान, धायडे कुटुंबीय मूळचे मांगलवाडी (ता.रावेर) येथील रहिवासी आहे. मात्र, आकाशच्या वडिलांच्या निधनामुळे ते दुसखेडा या मामाच्या गावी स्थायीक झाले होते. मृत तरुण हा घरातील कमावता होता. मयत तरुणाच्या पश्चात वृद्ध आई व एक भाऊ असा परिवार आहे.