इसिएतर्फे शिक्षकांना निसर्ग परिचय अभ्यास दौरा

0

पिंपरी (प्रतिनिधी) – पर्यावरण संवर्धन समिती (इसिए)तर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी व महापालिकेच्या शाळेतील 44 शिक्षकांना शनिवारी मयुरेश्‍वर अभयारण्य सुपे येथे निसर्ग परिचय अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. महापालिका शिक्षण विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे, इसिएचे संस्थापक विकास पाटील, संचालक हिरामण भुजबळ, प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, मृगेंद्र दमकले, शिकंदर घोडके, सुषमा पाटील, सागर बंडलकर, शंकर पाल, स्वाती तन्नू, शीतल महंकाळे, मंगला पवार, अनिल दिवाकर, अनघा दिवाकर, मीनाक्षी मेरुकर, रंजना कुदळे, गोविंद चितोडकर, सतीश पाटील आदी सहभागी झाले होते .

* दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन!
अभयारण्य वनसंरक्षक यांच्या अखत्यारीत आहे. या अभ्यास दौर्‍यामध्ये शिक्षकांना अभयारण्यात भटकणारे चिंकारा या दुर्मिळ नामशेष होऊ लागलेल्या वन्य प्राण्याचे दर्शन घडले. प्रसंगी दुर्मिळ चिंकारा ,लांडगा, तरस, घोरपड व इतर सरपटणारे प्राणी तसेच तितर, चिमण चंडोल, तुरेवाला चंडोल, कापशी, गांधारी, वेडा राघू सारख्या प्राण्यांची जीवन पद्धती व अस्तित्वा बाबत अभ्यास पूर्वक माहिती वनसंरक्षक शिल्पा रूपनवर व डॉ. महेश गायकवाड यांनी दिली. शिक्षकासोबत संवाद साधून अभयारण्याचे महत्व स्पष्ट केले. कोल्हा, लांडगा व खोकड हे प्राणी कसे ओळखायचे याचे सविस्तर मार्गदर्शन केले गेले.

* विनामूल्य शिक्षक दौर्‍याचे आयोजन!
इसिएने आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील 630 शाळांपैकी 350 पेक्षा जास्त शाळांमध्ये विद्यार्थी पर्यावरण समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्यासाठी निसर्ग दर्शन अभ्यास दौरा शिक्षकांना विनामूल्य आयोजित केला होता. प्रवासात औषधी वनस्पती बाबत माहिती व उपयोग बाबत सचित्र मार्गदर्शन इसिए संचालक हिरामण भुजबळ यांनी केले.