मुंबई : राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीचा प्रश्न चांगलाच गाजत असतानाच, शेतकर्यांना कृषी संदर्भात सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात या हेतूने राज्य सरकारकडून विचारविनिमय सुरू आहे. इस्रायलच्या धर्तीवर राज्यात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी यासंदर्भात मंत्रालयात बैठक पार पडली.
एका गावातील शेतकर्यांना कृषी संदर्भातील सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. इस्त्रायलच्या जेथ्रो कंपनीच्या सहाय्याने यवतमाळ येथील डेहणी या गावी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी मंत्रालयात इस्त्रायलच्या जेथ्रो कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर बैठक पार पडली. कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विकास करण्यासाठी डेहणी गावात सेंटर ऑफ एक्सलन्स हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर उभारावयाचे ठरले आहे. या प्रकल्पाची प्राथमिक आखणी करून, सादरीकरण करण्यात यावे अशा सूचना सदाभाऊंनी दिल्या आहेत. त्यानंतर राज्यभरात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या बैठकीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जेथ्रो कंपनीचे प्रतिनिधी या बैठकीत जेथ्रो कंपनीचे गॅबी नाहून, कौऊन्सिल जनरल ऑफ इस्त्रायलचे प्रतिनिधी अनय जोगळेकर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.