नवी दिल्ली । आता चीन आणि पाकिस्तानच्या कुटील कारस्थानांना उधळून लावण्यासाठी एअरफोर्स इस्त्रोची मदत घेणार आहे. येत्या काही महिन्यात लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उपग्रहांचेसुद्धा प्रक्षेपण होणार आहे. प्रक्षेपित होणार्या उपग्रहांपैकी काही उपग्रह रणनीतीक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. या उपग्रहांमुळे कुरापतखोर चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास आपल्या सुरक्षा यंत्रणांना मदत मिळणार आहे तसेच आपली जमीन आणि समुद्री सीमा अधिक सुरक्षित होईल.
युद्धक्षमतेमध्ये कैकपटीने वाढ होणार
सप्टेंबर महिन्यात इस्त्रो इंडियन एअर फोर्ससाठी जीएसएटी-7 ए आणि टेहळणीसाठी आरआयएसएटी-2 ए हा उपग्रह वर्षअखेरीस प्रक्षेपित करणार आहे. जीएसएलव्हीएमके-2 या रॉकेटद्वारे जीएसएटी-7 ए प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे एअर फोर्सची जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाईतळ आणि अवॉक्स विमानांमधील नेटवर्क जोडता येईल. यामुळे एअर फोर्सच्या युद्धक्षमतेमध्ये कैकपटीने वाढ होणार आहे.
सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रुक्मिणी
खास भारतीय नौदलासाठी इस्त्रोने निर्मिती केलेल्या रुक्मिणी उपग्रहाचे 29 सप्टेंबर 2013 मध्ये प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहामुळे नौदलाला भारतीय महासागर क्षेत्रातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवता येते. भारतीय युद्धनौका, पाणबुड्या आणि विमाने कुठे आहेत, याची माहिती ठेवता येते. रुक्मिणीला भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते.