प्रवाशांना फटका ; मुंबई पॅसेंजरसह हुतात्मा, गोदावरी, राज्यराणी व ईगतपुरी पॅसेंजर रद्द ; लहान स्थानकावरील प्रवाशांचे सर्वाधिक होणार हाल
भुसावळ- ऐन सणासुदीत ईगतपुरी रेल्वे स्थानकावर रेल्वेने रविवार, 4 रोजी दहा तासांचा मेगाब्लॉक घेण्याचे जाहीर करून प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. या ब्लॉकमुळे तब्बल सहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून सात गाड्यांच्या मार्गात तसेच वेळेतही बदल करण्यात आल्याने दिवाळीनिमित्त गावाकडे परतणार्या चाकर मान्यांचे मोठे हाल होणार आहेत. आधीच गर्दीमुळे पॅक असलेल्या गाड्या रद्द तसेच उशिरा धावणार असल्याने ऐनवेळी दुसर्या गाड्यांचे आरक्षित तिकीट प्रवाशांना मिळणार कसे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. भुसावळ-मुंबई पॅसेजर, भुसावळ पुणे हुाता एक्स्प्रेस. गेादावरी, राज्यराणी एक्स्प्रेससह ईगतपुरी पॅसेजर रद्द करण्यात आल्या आहे. एैन दिवाळीच्या दिवसात रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहे.
दहा तासांच्या मेगाब्लॉकने प्रवाशांचा संताप
रविवारी ईगतपुरी रेल्वे स्थानकावर विशेष ट्रॅफीक, सिग्नल अॅण्ड टेलिकॉम आणि पॉवर ब्लॉक दहा तासांठी घेण्यात आला आहे. ऐन दिवाळीत घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याने भुसावळ विभागातील अनेक छोट्या-मोठ्या स्थानकावरून प्रवास करणार्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. मुळात एस.टी.गाड्यांना असलेली गर्दी व त्यातच पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला असून रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरूद्ध तीव्र रोष व्यक्त होत आहे.
या गाड्या झाल्या रद्द
शनिवारी व रविवारी सुटणारी भुसावळ-मुंबई पॅसेजर रद्द असून रविवार व सोमवारी मुंबई भुसावळ पॅसेजर रद्द करण्यात आली आहे शिवाय रविवार, 4 रोजीसाठी कुर्ला-मनमाड (गोदावरी एक्स्प्रेस) ही गाडी दोन्ही बाजूची रद्द करण्यात आली आहे. रविवारी अप-डाऊन मार्गावरील राज्यराणी एक्सप्रेस, भुसावळ-पुणे (हुतात्मा एक्स्प्रेस) आणि ईगतपुरी-मनमाड पॅसेजर गाडी या रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांच्या वेळेत झाला केला बदल
रविवारी मुंबई, कुर्ला येथून सुटणार्या गाड्या या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने सोडल्या जाणार आहे. यात 11055 कुर्ला-गोरखपूर एक्प्रेस ही गाडी सकाळी 10.55 ऐवजी दपारी एक वाजता सुटणार आहे. ही गाडी दुपारी 2.32 ते 4.45 या वेळेत आटगाव स्थानकावर थांबवली जाणार आहे. 12542 कुर्ला-गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी सकाळी 11. 10 वाजता सुटणारी गाडी दुपारी 1.20 वाजता सुटेल. ही गाडी 2.20 ते 4.50 या वेळेत वाशिंद स्थानकावर थांबवली जाईल. 12869 मुंबई-हावडा एक्स्प्रेस ही गाडी सकाळी 11.05 ऐवजी दुपारी 1.30 वाजता सुटेल. ही गाडी दुपारी 2.50 ते 5.20 या वेळेत खडावली स्थानकावर थांबवली जाणार आहे. 12141 कुर्ला ते पाटलीपुत्र एक्स्प्रेस ही गाडी रात्री 11.35 वाजता सुटते ती 5 नोव्ळेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता सुटेल. मुंबई-गोरखपूर विशेष गाडी दुपारी 2.20 ऐवजी रात्री 12.30 वाजता सुटेल, तर शनिवारी सुटणारी पाटलीपूत्र 11060 कुर्ला-छपरा एक्स्प्रे, 11080 गोरखपूर कुर्ला, 15018 गोरखपूर-कुर्ला या गाड्या त्यांच्या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने मुंबईला पोचणार आहे.
या गाड्यांना थांबविणार विविध स्थानकांवर
रविवारी मुंबई, कुर्ला येथून सुटणार्या गाड्या त्यांच्या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने सोडल्या जाणार आहे, यात दरभंगा एक्स्प्रेस ही गाडी कसारा स्थानकावर दुपारी 2.13ते 5 पर्यत थांबविणार आहे, कामायनी एक्स्स्प्रेस ही गाडी दुपारी 2.20 ते 4.50 या वेळेत खडावली स्थानकावर थांबविणार आहे. कल्याणमार्गे जाणारी मंगला एक्स्प्रेस ही गाडी 2.50 ते 4.50 या वेळेत आसनगाव येथे थांबविणार आहे. लखनऊ मुंबई पुष्पक एक्स्प्रेस व बरेली कुर्ला या गाड्या भुसावळ विभागातील स्थानकांवर थांबविल्या जाणार आहेत.
या गाड्या धावणार अर्ध्यापर्यतच
नागपूर येथून शनिवारी सुटणारी नागपूर मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी रविवारी नाशिक रोडपर्यंतच जाणार आहे. मुंबई-नागपूर सेवाग्राम ही गाडी नाशिक स्थानकावरून सोडली जाणार आहे. शुक्रवार, 2 रोजी सुटलेली राजेंद्रनगर-कुर्ला एक्स्प्रेस ही गाडी ठाण्यापर्यतच जाणार आहे.
सात गाड्यांच्या मार्गात केला बदल
2 नोव्हेंबर रोजी हावडा येथून सुटलेली हावडा-कुर्ला एक्स्प्रेस ही गाडी जळगाव, वसईरोड, दिवा या मार्गाने जाणार आहे. शनिवारी जाणारी अलाहाबाद कुर्ला दुरंतो एक्स्प्रेस ही गाडी मनमाड, दौड, कल्याण मार्गे जाणार आहे. रविवारी जाणारी कुर्ला कामाख्य एक्स्प्रेस, नांदेड तपोवन एक्स्प्रेस, जालना दादर जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या कल्याण, दौड, मनमाड मार्गे जाईल,दादर जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी कल्याण, दौड, मनमाड मार्गे जाणार आहे. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी मनमाड, दौड, कल्याण मार्गे जाणार आहे. कामामुळे अन्य काही गाड्या या त्याच्या निर्धारीत वेळेपेक्षा अर्धा ते दिड तास विलंबाने धावतील तर ब्लॉकचे काम झाल्यावरही अर्धा ते एक तास विलंबाने धावणार आहे.