कोलकाता : ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानातील एका स्टॅंडला भारतीय क्रिकेट संघाला आक्रमकतेचे धडे देणारे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव दिले जाणार असून गांगुली यांच्यासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचेही नाव एका स्टॅंडला दिले जाणार आहे.
ईडन गार्डन्स हे मैदान आणि त्याचा परिसर हा लष्कराच्या अधिपत्याखाली असल्यामुळे येथे कोणताही बदल करण्यासाठी लष्कराची परवानगी घेणे आवश्यक असते. ईडन गार्डन्सवरील काही स्टॅंडची दुरुस्ती, नूतनीकरण आणि त्यांचे नाव बदलण्यासाठी बंगाल क्रिकेट संघटनेने लष्कराकडे गेल्या वर्षी परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्याने आता स्टॅंडच्या नामकरणाचा कार्यक्रम घेतला जाईल.
याशिवाय, ईडन गार्डन्समधील स्टॅंडला माजी क्रिकेटपटू पंकज रॉय आणि बंगाल क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष बी. एन. दत्त, ए. एन. घोष आणि स्नेहांशू आचार्य यांचेही नाव दिले जाणार आहे. लष्कराकडून यासंदर्भात काल (गुरुवार) परवानगी मिळाल्याचे बंगाल क्रिकेट संघटनेने सांगितले. गांगुली हे सध्या बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यामुळे ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पद सोडावे लागले. त्यानंतर गांगुली हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र लोढा समितीच्या शिफारशींनुसार एखाद्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने पद सोडल्यानंतर तीन वर्षे कुठल्याही पदावर काम न करणे आवश्यक आहे. त्यामुळे गांगुली सध्या अध्यक्षपदासाठी पात्र नाहीत.