ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास – अजित पवार

0

इचलकरंजी : ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदन कारंडे यांच्या बालाजी नागरी सहकारी पतसंस्थाच्या रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभात पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. काँगेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे , राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील यद्रावकर, उदय लोखंडे यांची यावेळी उपस्थिती होती.

अजित पवार बोलताना म्हणाले की, ईव्हीएमची काळजी करू नका, योग्य चिन्हांचे बटण दाबा मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणू लागेल,असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी ४० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे .उर्वरित ८ जागांच्या वाटपावर चर्चा येत्या आठवड्यात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून सरकारच्या कामगिरीवर एकही घटक समाधानी नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम आठवतो. हनुमानाची जात काढली जाते. कारण यांच्या डोक्यात कायम जातीयतेचा किडा वळवळत असतो अशी टीका पवार यांनी केली. मुख्यमंत्री ,महसूल मंत्री, वस्त्रउद्योग मंत्री नुसत्या फसव्या घोषणा करतात. कसलीही कृती त्यांच्याकडून होत नाही. राज्यातील वस्त्रउद्योग धंद्याची या सरकारने वाट लावली आहे. केंद्रातले सरकार व राज्यातले सरकार हे फसवे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.