पिंपरी-चिंचवड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये शहराचा प्रथम क्रमांक येण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले. महापालिका व पर्यावरण संवर्धन समिती यांच्या वतीने रविवारी शहरात विविध ठिकाणी राबविण्यात येणार्या ई-कचरा संकलन अभियानचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. रिव्हर रेसिडेन्सी, चिखली येथे हा कार्यक्रम झाला.
अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित
कार्यक्रमास पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह अधिकारी आणि पर्यावरण संवर्धन समितीचे विकास पाटील, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सुर्यकांत मुथियान, आय.आय.सी.एम.आर. इन्स्टिट्यूटचे अभय कुलकर्णी, कमिन्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापक सौमिया मेहरोम, श्री रिसायकलचे व्यवस्थापक विनीत बियानी, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, अजय पाताडे, ईश्वर परमार ग्रुपच्या दर्शना परमार आदी उपस्थित होते.
112 ठिकाणी ई-वेस्ट संकलन व्यवस्था
महापौर काळजे म्हणाले, महानगरपालिका व पर्यावरण संवर्धन समिती यांच्या वतीने शहरात विविध 112 ठिकाणी राबविण्यात येणारे ई-वेस्ट संकलन महाअभियान कौतुकास्पद आहे. आजच्या वापरात नसलेली इलेक्ट्रॉनिकल वस्तू म्हणजे ई-कचरा होय. यामध्ये मोबाईल फोन, रेडीओ, इस्त्री,पंखे आदी वस्तूंचा समावेश होतो. या सर्व वस्तूंचे विघटन शास्त्रीय पद्धतीने होत नाही. सध्या या वस्तू आपण अधिकृत संस्थेकडे न देता भंगारात अथवा कच-यात फेकून देतो. त्यातील घटक रसायने व धातू पर्यावरणास व मानवास घातक ठरतात. तेंव्हा ई-वेस्टमध्ये शास्त्रीय दृष्ट्या विघटन करण्यार्या सरकारमान्य संस्थेकडेच असा कचरा द्यावा. नर्मदा प्रमाणेच पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. लवकरच चिखली, चर्होली, मोशी, दिघी, या भागाचा विकास करण्यात येईल. महापालिकेबरोबरच नागरिकांनीही शहर स्वच्छतेसाठी जबाबदारीने काम केल्यास शहर नक्कीच स्वच्छ व सुंदर होईल.
आपापल्या भागात श्रमदान करा
आयुक्त हर्डीकर म्हणाले, केंद्र शासनाने विकसित केलेले स्वच्छता अॅप जास्तीत जास्त लोकांनी मोबाईलवर डाऊनलोड करावे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये आपले शहर अव्वल स्थानी येण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता अॅप कुटुंबातील किमान दोन सदस्यांनी डाऊनलोड करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी परिसरातील समस्यांबाबत या अॅपद्वारे आपल्या समस्या कळवाव्यात. ई-कचर्याचे रिसायकलिंग व्यवस्थित होणे गरजेचे आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये कचर्याबाबत श्रमदान करण्यात यावे. ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा मोहिमेत सहभाग घेऊन जवळच्या कचरा संकलन केंद्रावर ई-कचरा जमा करावा.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, विकास साने, अभय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विकास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले.