पिंपरी चिंचवड : सामाजिक मूल्य जोपासत प्रशासकीय कामकाज करीत असताना, नागरिकांना उत्तम व तत्पर सेवा देणे म्हणजेच सुशासन आहे. ई गव्हर्नंन्सच्या माध्यमातून सुशासनापर्यंत अधिक पोहोचता येणे शक्य असून पिंपरी चिंचवड महापालिका पुढील सहा महिन्यांच्या काळात ई-गव्हर्नंन्सच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. राज्य शासनाच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्यावतीने अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म दिवस सुशासन दिवस म्हणून ऑटोक्लस्टर येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेत ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप तसेच वैद्यकीय अधिकारी, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक मुल्यांचे जतन करण्याचा सुशासनाचा उद्देश…
हे देखील वाचा
आयुक्त हर्डीकर म्हणाले, ’’गुड गव्हर्नन्सचा प्रारंभ अमेरिकेत झाला असून कार्यक्षमता, सचोटी आणि पारदर्शकता ही सुशासनाची तीन महत्वाची वैशिष्टे आहेत. नागरिकांना प्रशासनामार्फत सेवा देताना सामाजिक मुल्यांचे जतन करुन सेवा देण्याचा सुशासनाचा उद्देश आहे. शासनाकडे डीजी लॉकरची सुविधा उपलब्ध आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडे येणार्या अर्जांची डिजीटल यादी विभागांनी करावी. प्रत्येक विभागाने गतीमानतेने व मुल्याधिष्टीत काम करावे’. यशदाचे व्याख्याते विठ्ठल दीक्षित यांनी सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिकृत करण्यात आलेल्या सेवा, अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा व सेवा हक्क नियम कालमर्यादेतील सेवा, द्यावयाची हमी, अपिलाच्या तरतुदी आणि अधिनियमांतर्गत येत असलेल्या शास्ती याबाबतची विस्तृत माहिती या कार्यशाळेत दिली.
सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध…
महापालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या सेवा या महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम 2015 मधील अंतर्गत असलेल्या विविध तरतूदीनुसार नागरिकांना कार्यक्षमतेने, पारदर्शकपणे व वेळेत उपलब्ध करुन देणेबाबत प्रशासनाची कटीबध्दता असल्याचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात करसंकलन, आकाशचिन्ह परवाना विभाग, पाणी पुरवठा, विद्युत, अग्निशामक, प्रभाग कार्यालये आदी विभागातील सेवांचा समावेश आहे.