ई-ग्राम सॉफ्टवेअरमुळे राज्यात पुणे जिल्हा अव्वल!

0

पुणे । जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या नोंदी ऑनलाईन करण्यासाठी आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे दाखले ऑनलाइन मिळण्यासाठी ई-ग्राम सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या दाखले मिळवता येणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या केलेल्या अनोख्या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेतली आहे. या ई-ग्राम सॉफ्टवेअरमुळे राज्यात पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातील 796 केंद्रांमध्ये हे सॉफ्टवेअर कार्यान्वित होणार असल्याने त्याचा ग्रामीण भागातील जनतेला फायदा होणार आहे.राज्यात सध्या 28 हजार 728 ग्रामपंचायती आहेत. त्या ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याची योजना सध्या सुरू आहे. पूर्वी संग्राम नावाचे सॉफ्टवेअर कार्यान्वित केले होते. परंतु, त्या सॉफ्टवेअरमुळे 28 प्रकारचे दाखले उपलब्ध होत होते. त्यानंतर ई-ग्राम’ सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

33 प्रकारचे दाखले मिळणार ऑनलाइन
पुणे जिल्ह्यात 1 हजार 407 ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतींमधील कामकाजाच्या नोंदी ऑनलाइन करण्यात याव्यात यासाठी पुणे जिल्ह्यातील केंद्रांवर ई-ग्राम सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पुणे वगळता सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पुणे जिल्ह्यातील 796 केंद्रांमध्ये हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांना 33 प्रकारचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांच्या तुलनते ई-ग्राम सॉफ्टवेअर कार्यान्वित होण्यामध्ये पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यात सॉफ्टवेअर शंभर टक्के कार्यान्वित करण्यात आले, अशी माहिती आपले सरकार सेवा केंद्राच्या समन्वयकांनी दिली.

नमुने फिडिंग करण्याची प्रक्रिया
पुणे जिल्ह्यात 1 हजार 407 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी जिल्ह्यात 796 ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहे. सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी 33 प्रकारचे दाखले नमुने फिडिंग करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना ऑनलाइन दाखले मिळायला सुरुवात होईल.
– संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी