ई-तक्रार निवारण प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिक समाधानी

0

नवी मुंबई । नागरिकांच्या नवी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कामांचे निराकरण सहजसोप्या पद्धतीने व विहित कालावधीत व्हावे याकरिता महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या काटोकोर नियंत्रणाखाली सुरू असलेल्या ’ऑनलाईन ई – तक्रार निवारण प्रणाली’ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून सप्टेंबर 2016 पासून आजतागायत प्राप्त 10256 तक्रारींपैकी 10105 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे म्हणजेच 98.55 टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याने नागरिकांकडून आपल्या तक्रारींचे निवारण विहित वेळेत करणारी प्रभावी प्रणाली म्हणून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत घोषित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स वॉर्ड 2017-18 मध्ये नागरिक केंद्रिभूत सेवांमधील विशेष उल्लेखनीय कार्य क्षेत्राकरीता देशातून निवडक पहिल्या पाच शासकीय संस्थांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऑनलाईन ई-तक्रार निवारण प्रणालीस नामांकन लाभले होते.

21 व्या शतकातील महानगर म्हणून संबोधली जाणारी नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यात आघाडीवर राहिली आहे. याच अनुषंगाने लोकाभिमुख कारभार व्हावा व नागरिकांना घरबसल्या वेबसाईटवरून एवढेच नव्हे तर अगदी हातातल्या स्मार्ट फोनवरूनही महानगरपालिकेच्या एखाद्या नागरी सुविधेविषयी अथवा महानगरपालिकेशी संबंधित बाबींविषयी तक्रार अथवा सूचनाकरण्यासाठी अगदी सहजसोप्या पध्दतीने ’ऑनलाईन ई -तक्रार निवारण प्रणाली’ उपलब्ध करून देण्यात आली आहे.

383 अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस
या ई-प्रणालीवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष असल्याने महापालिकेचे सर्वच विभाग या प्रणालीव्दारे प्राप्ततक्रारींचे विहित वेळेत निराकरण करण्यासाठी दक्ष असतात असे या प्रणालीच्या विश्‍लेषण अहवालाव्दारे निदर्शनास येत आहे. अशाप्रकारे ई-प्रणालीव्दारे प्राप्त तक्रारींचा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. विभागवार नियमित आढावा घेत असून त्याच्या विश्‍लेषणअहवालाव्दारे किती तक्रारींचा निपटारा झाला? तक्रार प्रलंबित राहण्याची कारणे? नागरिक समाधानी आहेत काय? या विषयीची सविस्तर माहितीसंकलीत केली जात आहे. विहित वेळेत ज्या तक्रारींचा निपटारा झाला नाही त्याविषयी पूर्णत: शहानिशा करून 383 अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस या प्रणालीतील स्वयंचलित यंत्रणेव्दारे देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे नागरिकांनी दाखल केलेल्यातक्रारींवरील कार्यवाहीचा नियमित विश्‍लेषणात्मक आढावा घेणारी व त्यानुसार कार्यपद्धतीत लोकहिताय बदल करणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. या प्रणालीचा विश्‍लेषणात्मक आढावा घेतल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे असे मोघम उत्तर न देता कार्यवाहीच्या माहितीसह संपूर्ण उत्तर द्यावे, असे निर्देश महापालिका अधिकार्‍यांना दिले आहेत.