1 जागीच ठार तर 3 जखमी
उतरतीवर ताबा सुटल्याने भल्या पहाटे घडला अपघात
नवापूर : उकळापाणी गावाजवळ रिक्षा पलटी होऊन अपघात झाल्याची घटना शनिवारी, 11 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. अपघातात एक जण ठार तर 3 जण जखमी झाले असून उर्वरित 3 जण सुखरुप बचावले आहेत.अपघात होताच 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून पाचारण करण्यात आले. जखमींना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अपघातात किरण सखाराम गावीत(25, रा.उबर्डी ता.नवापूर) हा जागीच ठार झाला आहे.
सकाळी नेहमी प्रमाणे वाहने ये-जा करत असतांना उकळापाणी गावाजवळ रिक्षा अचानक पलटी होऊन रस्त्यावर प्रवासी फेकले गेले. जबर जखमी होऊन अपघातातील जखमी झालेल्यांमध्ये रविस गावित (30), सर्मिला गावित (34), रजूबाई गावित (55, सर्व रा.उबर्डी ता.नवापूर) यांचा समावेश आहे.
लग्नाला गेले होते…!
उबर्डी गावातील ग्रामस्थ रात्री गुजरातमध्ये लग्नाला गेले होते. लग्नाला हजेरी देऊन पहाटे ते आपल्या उबर्डी गावी जाण्यासाठी अॅपेरिक्षाने निघाले होते. तोच पहाटे 6 वाजेला उकळापाणी गावाजवळ अपघात झाला. त्यांनी खासगी अॅपेरिक्षा भाड्याने केली होती. रिक्षा भरधाव वेगाने असल्याचे सांगण्यात आले.
रुग्णवाहिका धावली अन् वाचले ग्रामस्थांचे प्राण
उकळापाणी रस्त्यावर अपघात होताच कुणीतरी 108 रुग्णवाहिकेला संपर्क केला. तोच 108 घटनास्थळी धावून आली. 108 मधील डॉ. राहुल सोनवणे व पायलट लाजरस गावित यांनी तात्काळ जखमीवर उपचार सुरु केले. इतर जखमी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. मयताला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, उतरतीमुळे चालकाकडून रिक्षा कंट्रोल झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याचा ताबा सुटून अपघात घडला. रिक्षात उबर्डी गावातील 7 जण बसले होते. त्यातील 3 जण जबर जखमी तर 3 जणांना काहीच लागले नसून 1 जागीच मयत झाला. दरम्यान, या उतरती रस्त्यावर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.