प्रा.डॉ.स्मिता अवचार ; भुसावळ शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय परीषद
भुसावळ- उच्च शिक्षणामध्ये ग्रंथालयाचे महत्व अनन्यसाधारण असून तेथे वापरले जाणारे तंत्रज्ञान जितके विकसित होत जाईल तितकी लिंग समभावाची जाणीव विकसीत होईल आणि ही जाणिव जितकी विकसित होईल तितका आपला राष्ट्रीय विकास जास्त होईल त्यामुळे तिन्ही चर्चासत्रांचे महत्व आपल्यादृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.स्मिता अवचार यांनी येथे व्यक्त केले. शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, वाणिज्य विभाग आणि मानव्य विद्याशाखेतर्फे सोमवारी तीन राष्ट्रीय परीषदांचे आयोजन करण्यात आले. या परीषदेच्या उद्घाटनप्रसंगी अवचार या बोलत होत्या.
तृतीय पंथीयांचे प्रश्न विचारात घ्यावे लागतात -प्राचार्य
प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा म्हणाल्या की, महाविद्यालयाला नॅक समितीने नुकतीच भेट देऊन इ + ही श्रेणी दिली. अर्थात तेवढ्याने आम्ही समाधानी नाही, म्हणूनच आमचा स्टाफ पुन्हा जोमाने कामाला लागला असून विद्यापीठानेही आम्हाला एकाच वेळी चार चर्चासत्रे मंजूर केली. आज येथे जी तीनही चर्चासत्रे होताहेत त्यांची व्याप्ती खूपच मोठी आहे. अगदी लिंग समभावाचा विचार करायचा म्हटले तरी आज फक्त स्त्री पुरुषांबद्दल चर्चा करून हा विषय पूर्ण होऊ शकत नाही कारण आज तृतीयपंथी लोकांचेही प्रश्न विचारात घ्यावे लागताहेत. त्यांनाही जगण्याची उत्तम जगण्याची संधी देण्याची गरज आहे, हे आपण विसरु नये. उद्घाटन सत्रानंतर तीन वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासकांनी आपापले शोधनिबंध सादर केल्यानंतर त्यावर अर्थपूर्ण चर्चाही झाल्या.
यांची होती उपस्थिती
चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री स.वि.प्र.मंडळाचे सल्लागार जयंती सुराणा, प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य शिल्पा पाटील, पुणे विद्यापीठाचे ग्रंथपाल एस.के.पाटील, मनोज गायकवाड (शहादा), विद्या पाटील (धुळे), ग्रंथपाल एस.एस.पाटील यांची उपस्थिती होती. ग्रंथपाल एस.एस.पाटील यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचलन प्रा.संध्या राजपूत तसेच डॉ.जे.पी.तळेगावकर यांनी पाहुण्यांचा परीचय दिला. डॉ.व्ही.एस.पाटील यांनी आभार मानले.