1972च्या दुष्काळाच्या पुनरावृत्तीची शक्यता; शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडणार
शेती आणि मच्छिमार व्यवसाय धोक्यात : टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ
इंदापूर : पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा घटू लागला आहे. त्यामुळे 1972 च्या दुष्काळाच्या पुनरावृतीचे ढग दाटून आले आहेत. या दोन जिल्ह्यांतील शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडून पडणार आहे. शेती आणि मच्छिमार व्यवसाय धोक्यात आला आहे. उजनीच्या कार्यक्षेत्रात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या महिन्यापासून सोलापुरसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील उजनी काठच्या चार तालुक्यांतील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ लवकरच येणार आहे. सोलापूर जिल्ह्याला पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. धरणातील पाणीही नदीपात्रात खोलवर गेल्याने उजनी काठच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लवकरच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस काहीच झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पिके वाचविण्यासाठी धडपड
पुणे धरण साखळीतही पुरेसा पाणीसाठा नसल्याने या धरणातही अपुरा पाणीसाठा आहे. त्यामुळे वरील धरणांवर अवलंबून असणारे उजनी धरणातील पाणीसाठा मृतसाठ्याच्या जवळ आला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणी पेटणार आहे. पाणीसाठा कमी झाल्याने पाणलोट क्षेत्रातील हातातोंडाला आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. तर उभी पिके जगविण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दररोज किमान 20 फूट पाणी खाली सरकत असल्याने रोजच पाईप वाढविणे, वायर वाढविणे, विद्युत पंप उचलून खाली सरकवणे आदी कामे करण्यासाठी वेगळे मजूर शेतकर्यांना शोधावे लागत आहेत.
लवकरच वीजेचे संकट?
धरणात यावर्षी भरपूर पाणीसाठा होता. त्यातच सोलापुरकरांसाठी पाणी सोडल्याने साठा फारच कमी झाला आहे. यामुळे शेतकर्यांवर जलसंकट उभे राहिले आहे. हे संकट कमी की काय म्हणून आता उजनीकाठच्या शेतकर्यांवर लवकरच वीज संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यांवर दुहेरी संकट येऊन ठेपले आहे. यामुळे उजनी काठच्या शेतकर्यांवर 1975 पूर्वीचा काळ येणार आहे. 1972 मध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता. मात्र, आता पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भविष्यात उजनीचे पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही.
पाण्यासाठी लागते कसरत
धरण काठच्या शेतकर्यांचे हक्काचे पाणी सोलापुरकरांसाठी सोडल्याने कुठेतरी दिसणारे पाणीही आता पार नदीपात्रात खोलवर दिसू लागले आहे. यामुळे या भागातील शेतकर्यांना शेतीच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहू लागला आहे. नोव्हेंबर महिन्यात जर पाण्याची इतकी वाईट परिस्थिती झाली असेल तर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जलसंकटाबरोबर वीजसंकटही येण्याची भीती धरणग्रस्त शेतकर्यांना वाटत आहे. इंदापूर तालुक्याची पाण्याअभावी दुष्काळाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून लवकर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.
हिवाळ्यात पाणीटंचाई
ऐन हिवाळ्यात पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. आतापर्यंत नोंव्हेबर महिन्यातच पाणीटंचाई आ वासून उभी आहे. त्यात प्रशासनाच्या तोकड्या उपाययोजना करीत असल्यामुळे नागरिकांना ऐन थंडीत घाम फुटला आहे. प्रशासनाकडे मिनतवार्या करीत टँकरसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यंदाच्या दुष्काळात 1972 मधील आठवणी यानिमित्ताने जाग्या झाल्या आहेत. उजनी निर्मितीपासून सुजलाम सुफलाम् झालेला हा परिसर यंदा दुष्काळाच्या मरणकळा सोसत आहे. उजनी कार्यक्षेत्रातील शेतकरी आता दुष्काळाने पिचला आहे. त्यामुळे अजून सात महिने या मरणकळा सोसाव्या लागत आहेत.