8100 क्युसेक्सने विसर्ग : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
इंदापूर : संक्रांतीच्या मुहुर्तावर उजनी धरणातून भीमानदीला मंगळवारपासून 8100 क्युसेक्सने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. यामुळे पंढरपूर व सोलापूर शहरासाठी व नदीकाठच्या गावांसाठी पाणी सोडल्याचे उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वीजनिर्मितीसाठी सोमवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून 1600 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते, तर नदीला मंगळवारी सकाळी 8 वाजता 6500 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे, असे एकूण 8100 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत
औज बंधार्याची व पंढरपूरच्या बंधार्याची पाणीपातळी कमालीची खालावली असून रब्बी हंगाम पण सुरू असल्याने सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना व सोलापूर शहराला पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पाणी सोडण्याचे प्रशासनाने चार दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यादृष्टीने उजनी धरण व्यवस्थापन विभागाने मंगळवारी मकरसंक्रांतीच्या महूर्तावर पाणी सोडले आहे. असे असले तरी धरणाची पाणीपातळी कमालीची कमी झालेली दिसून येते. गेल्या वर्षी 15 जानेवारीला एकूण 102 टक्के धरणात पाणी होते. आज धरणात 39.73 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे येणार्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शेती पुढे मोठे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
धरणात 21.29 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा
सध्या उजनी धरणामध्ये एकूण पाणीपातळी 493.720 मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा 2405.63 दलघमी आहे. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 602.82 दलघमी असून त्याची टक्केवारी 39.73 टक्के आहे. उजनीमध्ये सध्या एकूण 84.94 टीएमसी पाणी असून त्यामध्ये केवळ 21.29 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.