शहादा। कें द्र सरकारने गरीब कुटुंबाकरीता उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर व शेगडी वाटपाची योजना सुरू केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात 15 गॅस वितरकांकडे हजारो लाभार्थी पात्र असून गेल्या आठ महिन्यांपासून पात्र लाभार्थ्यांना खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. मात्र खासदार साहेबांना गरिबांच्या योजनेतून मिळणारे गॅस सिलेंडर वाटपास वेळ मिळत नसल्याने उज्ज्वला लाभार्थी खासदारांच्या प्रतिक्षेत आहेत.
नाममात्र 100 रूपयात गॅस सिलेंडर व शेगडी
केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 पासून दारिद्य्र रेषेखालील व कमी उत्पन्नाचे स्त्रोत्र असलेल्या कुटुंबाकरीता त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी नाममात्र 100 रूपयात गॅस सिलेंडर व शेगडी देण्याची योजना आहे. या योजनेत जिल्ह्यातील 15 वितरकांनी उर्त्स्फु प्रतिसाद नोंदवून जिल्ह्यातील हजारो कुटूंबियांना या योजनेशी जोडून घेतले आहे. प्रत्येक वितरकाकडे हजाराहून अधिक पात्र लाभार्थ्यांची यादी तयार आहे. परंतु खा.डॉ.हिना गावित यांची वेळ उपलब्ध होत नसल्याने सदर योजनेचा लाभार्थ्यांना लाभ अद्यापपावेतो मिळू शकलेला नाही.
गॅस सिलिंडर किंमत 4600 रु.च्या दरम्यान
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तळागाळातील गरीब कुटुंबियांना या योजनेत उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला आहे. केंद्र सरकार पात्र लाभार्थ्यांना 100 रु.नाममात्र दरात गॅस शेगडी व सिलेंडर वाटप करणार आहे. पात्र लाभार्थ्यांकडून त्यांच्या मिळणार्या अनुदानातून 1600 रु. टप्प्याटप्प्याने वसुल करण्यात येणार आहे. बाजारात या गॅस सिलेंडरची किंमत 4600 रु.च्या दरम्यान आहे. गरीब कुटुंब ही किंमत एकरकमी मोजू शकत नाही म्हणून केंद्र सरकारने ही योजना उज्ज्वला नावाने सुरु केली आहे. नोव्हेंबर 2016 अखेर या योजनेचा कालावधी पुर्णत्वास येणार असून पात्र लाभार्थ्यांना सदर गॅस सिलेंडर व शेगडीचे वाटप न झाल्यास जिल्ह्यातील हजारो लाभार्थी या योजनेपासून वंचित होणार आहेत. त्यामुळे खासदारांची या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिक्षा लागलेली आहे. गरिबांना शहरात लाकुडफाटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने त्यांना रॉकेल किंवा जवळपासच्या झाडांची तोड करून इंधन मिळवावे लागते. सदर योजना सुरू झाल्यास गरिबांना लाकुडफाट्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही व धुरापासून त्यांचे रक्षण होईल व उज्ज्वला योजनेचा फायदा त्यांच्या रोजच्या जीवनात होईल.
लाभार्थ्यांसह वितरक तात्कळत
सदरच्या पात्र लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या वाटपासाठी जिल्हाभरातील वितरकांनी खा.हॉ.हिना गावित यांचेकडे अनेकवेळा साकडे घालून वाटपाची तारीख मागितल्याचे समजते, मात्र खा.डॉ.गावितांना गरीबांची चुल पेटविण्याची योजना शुभारंभ करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने डिसेंबर 2016 पासून खा.डॉ. गावित या प्रत्येक वितरकाला तारीख-पे-तारीख, तारीख-पे-तारीख… लाभार्थ्यांसह वितरकांनाही गॅस सिलेंडरच्या ऑक्सिजनवर ठेवत असल्याचे समजते. ही योजना खूपच महत्वकांक्षी योजना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबांच्या घरात सरपणाऐवजी गॅस सिलेंडरची ज्योत तेवत राहण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.