भुसावळ- उडीसामधील बारगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तरुणीला पळवल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. हा संशयीत आरोपी भुसावळातील इंदिरा नगर भागात राहत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून उडीसा पोलिसांनी स्थानिक बाजारपेठ पोलिसांची मदत घेत तरुणीसह आरोपीस अटक केली. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. आशिश पटेल असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.उडीसामधील बारगड पोलिस ठाण्यात तरुणीच्या पालकांनी तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता तर संशयीत पटेलबरोबर तरुणी लग्न करणार असल्याची माहिती मिळाल्यावरून उडीसाचे पथक गुरूवारी शहरात आले होते. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिस शेख, एएसआय शैला पाचपांडे यांची मदत घेत तरुण-तरुणींना बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. बारगड पोलिस ठाण्याचे एएसआय संजीव कुमार यांनी दोघांचा ताबा घेतला. याप्रसंगी पीडीत तरुणीची आईदेखील उपस्थित होती.