चाळीसगाव । आज 27 जून मध्य प्रदेशातील भोपाळ येथे महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज मंत्री महोदयांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत ज्या सरपंचांनी विविध कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यात नाशिक विभागाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील राजदेरवाडी, जळगांव जिल्ह्यातील चितेगाव, धुळे जिल्ह्यातील मलांजन, अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या ग्रामपंचायतींच्या सरपंचाचा आहे. ग्रामीण विकासाची जाण असलेलं नेतृत्व गावाला लाभल्यास गावाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. त्यातच ग्रामीण विकासाची आवड असलेल्या घराण्यात जन्म झाल्याने नेतृत्व गुण अबाधित राहतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे चितेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल भोसले. त्यांना ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची माहिती व जाण असलेले कार्यक्षम ग्रामसेविका सविता पांडे यांची जोड लाभल्याने त्यांनी गावात अनेक विकासात्मक कामे केली. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्यातील पहिली आय.एस.ओ मानांकन प्राप्त ठरलेली ग्रामपंचायत तसेच स्मार्ट ग्राम म्हणून मान मिळाला.
स्मार्ट ग्राम म्हणून गौरव
राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या ग्रामपंचायतीना राज्य शासनातर्फे विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 1 मे महाराष्ट्र दिनी चाळीसगाव तालुक्यातील स्मार्ट ग्राम म्हणून चितेगाव ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्र व 10 लक्ष रुपयांचा धनादेश देऊन राज्याचे कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. गावात सुखसोयी सुविधा कशा पुरविता येतील तसेच लोकांना योजनांची माहिती व विविध शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल याकडे सरपंच भोसले यांनी लक्ष केंद्रीत केले होते. गावातील समस्या सोडविण्यासाठी सरपंच, उपसरपंच किरण जाधव, ग्रामसेविका सविता पांडे आणि सहकारी प्रयत्नशील होते. तंटामुक्त गाव करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले त्यांनी ग्राम स्वच्छतेवर भर दिल्याने गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त झाले आहे. गावातील संगणकीकृत ग्रामपंचायत आणि प्रशस्त इमारत लक्ष वेधून घेते.