उत्तर प्रदेश| एकाबाजूला शहिदांच्या बाजूने आपणच गळे काढायचे आणि दुसर्याबाजूला त्यांच्याच कुटुंबाचा अपमान करायचा, हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडूनच हा घडला आहे. आदित्यनाथ सरकारने शहीद जवानाच्या कुटुंबियांचा अपमान केल्याचे प्रकरण समोर आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी रविवारी शहीद जवान प्रेम सागर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्री भेटीसाठी येणार म्हणून स्थानिक प्रशासनाने प्रेम सागर यांच्या घरात एसी, कार्पेट, सोफा आणि टॉवेल आदी साहित्याची व्यवस्था केली होती. कुटुंबियांची भेट घेऊन योगी माघारी फिरताच लगेचच प्रशासनाने या सर्व वस्तू उचलून घराबाहेर नेल्या. त्यामुळे सर्व स्तरातून टीकेची झोड उठली असून संतापाचे वातावरण पसरले आहे.
पाकिस्तानी लष्कराने दोन आठवड्यांपूर्वी नियंत्रण रेषेवर केलेल्या हल्ल्यात प्रेम सागर शहीद झाले होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. देवरीया गावात राहणार्या प्रेम सागर यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणे होत नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. योगी आदित्यनाथ यांनी फोनवरून चर्चा करून भेटण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी शहीद प्रेम सागर यांच्यावर अंत्यसंस्कार केले. योगी आदित्यनाथ ज्या खोलीत भेटणार त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाने एसी, सोफासेट, कार्पेट असे साहित्य आणून ठेवले होते तसेच वीजपुरवठा खंडित होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे भेट झाल्यानंतर अधिकारी तिथे आले व सर्व साहित्य गाडीत टाकून निघून गेले, असे कुटुंबियांनी सांगितले.
हा तर आमचा अपमान
प्रशासनाने आमचा अपमान केला आहे. स्थानिक प्रशासनाला इतकी घाई करण्याची गरज नव्हती ते दोन ते तीन दिवस थांबू शकत होते, अशी प्रतिक्रिया दया शंकर यांनी दिली. ते सुद्धा बीएसएफमध्ये आहेत. योगींनी आर्थिक मदतीचे आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरीचे आश्वासन दिले आहे. प्रेम सागर, परमजीत सिंग आणि आणखी एक जण नियंत्रण रेषेवर गस्तीवर असताना पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. 2 मे रोजी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. पाकिस्तानने त्यांच्या मृतदेहाची विटंबना केलेली होती. त्यामुळे दुःखी झालेल्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले.